आनंद अन् शुभेच्छांचा वर्षाव
आनंद अन् शुभेच्छांचा वर्षाव
दैनिक ‘सकाळ’च्या नूतन ठाणे कार्यालयात मान्यवरांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : दैनिक ‘सकाळ’च्या ठाणे विभागीय नूतन कार्यालयाचे शुक्रवारी (ता. ८) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय मंडळी, प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवरांनी ‘सकाळ’च्या ठाणे कार्यालयाला भेट दिली. भव्य वास्तू, ऐसपैस जागा, प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेत सर्वच मान्यवरांनी आनंद व्यक्त करीत शुभेच्छांचा वर्षाव केला.
वर्तमानपत्रांपासून दिवसाची सुरुवात : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
काळानुरूप वर्तमानपत्रांचे स्वरूप बदलले आहे; पण विश्वासार्हता कायम आहे, म्हणूनच रोजची सकाळ ही वर्तमानपत्रे वाचनापासून होते. यात कधी खंड पडला नसल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ‘सकाळ’चे नियमित वाचक असल्याचे ते म्हणाले. ‘सकाळ’च्या ठाणे विभागीय कार्यालयाला प्रताप सरनाईक यांनी भेट दिली. या वेळी रंगलेल्या गप्पांमध्ये त्यांनी जुन्या ‘सकाळ’ कार्यालयाच्या आठवणी जागवल्या. बदल ही काळाची गरज आहे. त्यानुसार दैनिक ‘सकाळ’चे ठाण्याचे नवीन कार्यालय असल्याचे कौतुक त्यांनी केले. परिवहनमंत्री म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर आपणही असेच अनेक बदल करण्याचा धाडसी निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी एसटीचे उत्पन्न वाढवणे, हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. घोडबंदर रस्ता रुंदीकरण, गायमुख घाटाच्या समस्येवर त्यांनी या वेळी चर्चा केली.
मन प्रसन्न झाले : पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे
‘सकाळ’च्या नवीन कार्यालयात पाऊल ठेवताच मन प्रसन्न झाले. चांगले वातावरण असेल, तर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. तशी ऊर्जा ‘सकाळ’च्या नवीन कार्यालयात जाणवत असल्याचे कौतुक पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी व्यक्त केले.
जुन्या आठवणींना उजाळा
दैनिक ‘सकाळ’च्या ठाणे कार्यालयाशी जोडलेले अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण नगरसेवक असल्यापासून ‘सकाळ’च्या ठाणे कार्यालयात येत आहोत. नगरसेवक ते परिवहनमंत्री हा टप्पा गाठत असताना दैनिक ‘सकाळ’चीही प्रगती होताना आनंद होत असल्याची भावना या वेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनीही जुन्या आठवणी जागवल्या. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर ते ठाणे कार्यालयात येत असत, असे ते या वेळी म्हणाले. ‘सकाळ’च्या ठाणे कार्यालयातील जुने सहकारीही या वेळी उपस्थित होते.
उपक्रमांची प्रशंसा
दैनिक ‘सकाळ’ हे केवळ वृत्तपत्र नाही. विविध माध्यमांतून रोज राज्यातील कोट्यवधी जनतेपर्यंत ‘सकाळ’चे उपक्रम पोहोचतात. या उपक्रमांची माहिती या वेळी ठाण्याच्या नवनिर्वाचित जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथन पांचाळ यांनी जाणून घेतली. या उपक्रमांची प्रशंसा करत शासनाच्या समाजोपयोगी विविध उपक्रमांना ठळक प्रसिद्धी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अतिथी लेखकाची जबाबदारी स्वीकारली
ठाणे परिवहन विभागाच्या अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दैनिक ‘सकाळ’च्या नवीन कार्यालयाला आवर्जून भेट दिली. या वेळी गप्पांमध्ये त्यांनी पहिवहनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ही माहिती वाचकांपर्यंत पोहोचावी, यासाठी लेखन करण्याची विनंती या वेळी करण्यात आली. त्याला तत्काळ होकार देत त्यांनी अतिथी लेखकाची जबाबदारी स्वीकारली.
आरोग्यदायी शुभेच्छा
ठाणे जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार हे पत्नी डॉ. अर्चना पवार यांच्यासह उपस्थित होते. ‘सकाळ’चे नवीन कार्यालय ऐसपैस आहे. असे वातावरण असेल तर कर्मचाऱ्यांचे आरोग्यही उत्तम राहते, असे या वेळी डॉ. कैलास पवार म्हणाले. हे कार्यालय पाहून ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या नवीन वास्तूचे वेध लागले असल्याचेही ते म्हणाले. या नवीन रुग्णालयामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री असेल, असेही ते म्हणाले.
वर्तमानपत्रे प्रभावी माध्यम : अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी
वृत्तवाहिन्या आल्या तेव्हा वर्तमानपत्रांचे अस्तित्व धोक्यात येईल, असे वाटले होते. त्यानंतर डिजिटल, ऑनलाइन माध्यमे आली; पण तरीही वर्तमानपत्रांनी आपले अस्तित्व केवळ टिकवून ठेवले नाही तर ते आजही प्रभावी माध्यम असल्याचे अधोरेखित केल्याचे मत ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केले. दैनिक ‘सकाळ’च्या विविध आवृत्त्यांमध्ये साप्ताहिक सुरू असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला; पण आता सर्वच साप्ताहिके बंद पडत असताना ‘सकाळ’ने अजूनही हा नजराणा वाचकांपर्यंत पोहोचवत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सानप यांची सहकार्याची ग्वाही
दैनिक ‘सकाळ’च्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. त्यासाठी कोणतीही मदत हवी असल्यास सहकार्य करणार असल्याची ग्वाही जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.