शहापूर तालुक्यात आदिवासी दिनाचा अलोट उत्साह

शहापूर तालुक्यात आदिवासी दिनाचा अलोट उत्साह

Published on

शहापूर तालुक्यात आदिवासी दिनाचा अलोट उत्साह
संघटनांच्या रॅली; घोषणांनी तालुका दुमदुमला

शहापूर, ता. ९ (वार्ताहर) : क्रांती दिन आणि आदिवासी दिनानिमित्त समाजाच्या विविध संघटनांनी तालुक्यात शहापूर शहर, खर्डी, अघई अशा विविध ठिकाणी रॅली काढून जल्लोष साजरा केला. लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. आदिवासी समाज समिती आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने यानिमित्त विविध संघटनांचा गुणगौरव केला. सोहळ्यात आदिवासी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या गुणवंतांचाही गौरव करण्यात आला.
शहापूर शहरात काढलेल्या रॅलीमध्ये आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा, कला, इतिहास आणि संघर्षाचे जिवंत दर्शन घडेल अशा पारंपरिक वेशभूषा करण्यात आल्या होत्या. त्यासोबतच नृत्य, गाणी, ढोल, ताशांच्या गजरामुळे वातावरणात अपूर्व उत्साह भरला होता. रॅलीमध्ये खासदार सुरेश म्हात्रे, आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे हेदेखील सहभागी झाले होते.

शहापूर : तालुक्यात आदिवासीदिनानिमित्त संघटनांनी रॅली काढली होती.


टोकरविरा येथे रॅली काढून मिरवणूक
वज्रेश्वरी, ता. ९ (बातमीदार) : प्रसाद चिकित्सा संस्थेद्वारे टोकरविरा येथे जागतिक आदिवासी दिन अत्यंत उत्साहात आणि दिमाखदारपणे साजरा करण्यात आला. या सोहळ्यात परिसरातील सुमारे २५० महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमातून आदिवासी संस्कृती, समृद्ध परंपरा आणि त्यांच्या जीवनशैलीचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले.
रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठी असलेले त्यांचे अनमोल महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या व्यतिरिक्त आदिवासी संस्कृतीचे मनमोहक दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजात जागरूकता निर्माण करणाऱ्या नाटिका सादर झाल्या. कार्यक्रमाची सांगता हळदी-कुंकू समारंभाने झाली. सहभागी महिलांचा सन्मान भेटवस्तू देऊन करण्यात आला. याप्रसंगी समाजातील पारंपरिक अवजारे आणि त्यांच्या वापराविषयी माहिती देऊन त्यांच्या समृद्ध ज्ञानाचा परिचय करून देण्यात आला. प्रा. भावेश करपट, लाल्यासाहेब खेवरा, ग्रामपंचायत सदस्य कोल्हेकर आणि संस्थेचे कार्यकारी व्यवस्थापक मिलिंद नरगुंद यांची उपस्थिती लाभली. त्यांनी समाजाच्या योगदानाचे गौरव केले. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे आवाहन केले.

वज्रेश्वरी :

किन्हवलीत जागतिक आदिवासी दिन साजरा
किन्हवली, ता. ९ (बातमीदार) : जागतिक आदिवासी दिनानिमित्त किन्हवलीत मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. अनेकांनी पारंपरिक पेहराव परिधान केला होता. विद्यार्थ्यांनी फेर नृत्य करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.
परिसरातील अनेक वाड्या-पाड्यातून आलेल्या शेकडो आदिवासी बंधू-भगिनींनी किन्हवली शहरातून मोठी मिरवणूक काढली होती. जागतिक आदिवासी दिन हा केवळ एक दिवस नाही, तर संघर्ष, स्वाभिमान आणि अस्मितेचा जागर आहे. भारताच्या इतिहासात आदिवासी समाजाचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी नेहमीच अन्यायाविरुद्ध लढा दिला. आपली संस्कृती, जमीन, जंगल आणि अस्तित्वासाठी संघर्ष केल्याने त्यांचा सन्मान व्हावा यासाठी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिलांनी आदिवासी बोली भाषेतील गाणी गायली. किन्हवली बसस्थानक परिसरात विद्यार्थ्यांनी फेर धरत आदिवासी नृत्य करून संस्कृतीचे दर्शन घडविले.

किन्हवली : आदिवासी दिनानिमित्त मिरवणुकीत सहभागी झालेले आदिवासी बांधव.
किन्हवली : बसस्थानक परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांनी फेर धरत नृत्य करून संस्कृतीचे दर्शन घडविले


भिवंडीत दुचाकी रॅली
भिवंडी (वार्ताहर) : श्रमजीवी संघटना भिवंडी तालुकाच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदिवासी आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये तालुकाध्यक्ष प्रदीप चौधरी, तालुका सचिव तानाजी लहांगे, गुरुनाथ वाघे, महेंद्र निरगुडा, मुकेश भांगरे यांसह मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते. त्यानंतर शहरातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून रॅली संपूर्ण तालुक्यात जयघोष करत जांभूळपाडा येथे सांगता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com