घणसोलीतील जलतरण तलावाची दुरवस्था
घणसोलीतील जलतरण तलावाची दुरवस्था
शिड्या तुटल्याने अनेकांना इजा; अस्वच्छ पाण्यामुळे त्वचेवर पुरळ
वाशी, ता. १० (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने अवघ्या तीन महिन्यांपूर्वी घणसोली सेंट्रल पार्क परिसरात जलक्रीडाप्रेमी, व्यावसायिक आणि मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक जलतरण तलाव सुरू केला होता. या सुविधेमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, परंतु अल्पावधीतच या तलावाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पोहणाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तलावातील शिड्या तुटलेल्या असल्याने पाण्यात उतरताना किंवा चढताना पोहणाऱ्यांना इजा होत आहे. पकड घेण्यासाठी बसवलेले लोखंडी रॉड निखळले असून, त्यांच्या जागी असलेल्या लाद्याही सुटल्या आहेत. परिणामी पोहताना किंवा खेळताना पोहणारे या लाद्यांवर आदळून जखमी होत आहेत. पाण्याची स्वच्छता राखण्यासाठी असणारे फिल्टर मशीनही नीट कार्यरत नसल्याने तलावाचे पाणी गढूळ राहते. या अस्वच्छ पाण्यामुळे त्वचेवर पुरळ, डोळ्यांचे विकार आणि संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका वाढला आहे.
दरम्यान, तलावाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून, प्रशिक्षणासाठी अर्ज घेण्यासाठी मोठी रांग लागते, मात्र ज्या ठिकाणी नागरिक उभे राहतात, तेथील पीयूपी स्ट्रक्चरची स्थितीही चिंताजनक असून, ते कधीही कोसळू शकते. प्रवेशद्वाराजवळ ते असल्यामुळे पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रत्यक्ष सुधारणा झालेली नाही. विशेषतः सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक असतो. लहान मुले आणि महिला पोहण्यासाठी येत असल्याने सुरक्षिततेचे महत्त्व अधिक वाढते. नागरिकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने दुरुस्ती व देखभाल करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
.................
महापालिकेने लाखो रुपये खर्चून ही सुविधा उभारली असली तरी नियमित देखभाल न केल्यास ती अपघाताचे केंद्र ठरू शकते, असा इशारा सभासदांनी दिला आहे. यासंदर्भात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते उपलब्ध झाला नाही.