उरण येथील मानसिक छळाला कंटाळून शिक्षकांचे उपोषण
उरण येथील मानसिक छळाला कंटाळून शिक्षकांचे उपोषण
उरण, ता. १० (वार्ताहर) : उरण तालुक्यातील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू पोर्ट (शेवा) येथील रुस्तुमजी केजरीवाला फाउंडेशन विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. सात वर्षांपासून सुरू असलेल्या वेतन व भत्त्यांच्या थकबाकीला कंटाळून सर्वांनी ११ ऑगस्ट २०२५ पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांच्या निवेदनानुसार, नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या रुस्तुमजी केजरीवाला फाउंडेशनने सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही. त्यासोबतच सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणारी वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्ताही जुलै २०१९ पासून देण्यात आलेला नाही. यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यावर आर्थिक संकट ओढवले असून, मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम झाला आहे. शालेय समितीत हा मुद्दा वारंवार मांडला गेला, मात्र प्रशासनाने डोळेझाकच केली, असा आरोप कर्मचाऱ्यांचा आहे.
शासकीय नियमांनुसार शाळेचे हस्तांतरण होऊन जवळपास तीन वर्षांचा काळ उलटला असला तरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या केवळ कागदावरच राहिल्या आहेत. विविध शासकीय कार्यालयांना अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्यावर ठोस कार्यवाही झालेली नाही. सहा वर्षांपासूनच्या पाठपुराव्यानंतरही प्रश्न प्रलंबित राहिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे. सात वर्षांची थकीत रक्कम फरकासह बँक खात्यात जमा होईपर्यंत ते जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेवा, येथील माध्यमिक इमारतीसमोर शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करतील. ११ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
...............
या निवेदनाची प्रत आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार मनोहर भोईर यांच्यासह विविध राजकीय नेते, पालक संघटना, शिक्षक संघटना, समाजसेवक, कामगार नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी सर्व मार्गांचा अवलंब करून पाहिला, मात्र न्याय न मिळाल्याने आता लढ्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा संघर्ष सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.