खारघरवासीयांना मिळणार हक्काचे समाज मंदिर
खारघरवासीयांना मिळणार हक्काचे समाजमंदिर
खारघर, ता. १० (बातमीदार) : खारघर वसाहतीत आजवर शासकीय समाजमंदिराची सुविधा नसल्याने रहिवाशांना लग्न, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर सोहळ्यांसाठी खासगी संस्थांच्या मंडपांवर किंवा सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर भाड्याने व्यवस्था करावी लागत होती. आता मात्र खारघर परिसरात पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सहा ठिकाणी समाजमंदिर उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सेक्टर १३ येथील पहिल्या समाजमंदिराच्या उभारणीस प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
सिडकोने खारघरमध्ये सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स, स्कायवॉक यांसारखे अनेक प्रकल्प उभारले, मात्र चाळीस सेक्टर असलेल्या या शहरात एकही शासकीय समाजमंदिर उभारले गेले नव्हते. पाच लाख लोकसंख्येच्या खारघरवासीयांना ही मोठी कमतरता भासत होती. ग्रामपंचायत काळात सेक्टर १३मध्ये समाजमंदिर बांधणीचे काम सुरू झाले होते, परंतु सिडकोने नकार दिल्याने प्रकल्पाला खीळ बसली. महापालिका स्थापन झाल्यानंतर नगरसेवक प्रवीण पाटील आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे सेक्टर १३ मधील भूखंड क्र. १३७ महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला.
महापालिकेने नुकतेच समाजमंदिर बांधकामासाठी निविदा मागविल्या असून, लवकरच काम सुरू होणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा आणि कार्यक्रमांच्या गरजेचा अभ्यास करून महापालिकेने आणखी पाच सेक्टरमध्ये (४, १०, १२, आणि ३६) समाजमंदिरासाठी भूखंड राखीव ठेवले आहेत. गावाचे शहरात रूपांतर झाल्यानंतर गल्लीबोळातील मोकळ्या जागा आणि अंगणे नष्ट झाल्याने पारंपरिक मंडप संस्कृतीला मर्यादा आल्या. त्यामुळे लग्नसोहळे किंवा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नवी मुंबईतील मंगल कार्यालयांचा पर्याय वापरण्याची वेळ येत होती. आता मात्र सहा समाजमंदिराची योजना राबविल्यास नागरिकांना हक्काची, सोयीस्कर आणि प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे.
.............
कोट :
खारघर गावात समाजमंदिरासाठी जागा हस्तांतरित करण्यात यश आले आहे. या जागेवर प्रशस्त समाजमंदिर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने लवकरच बांधकामास प्रारंभ होईल, असे माजी नगरसवेक प्रवीण पाटील यांनी सांगितले. तर सेक्टर १३ मधील समाजमंदिरासाठी नकाशा मंजुरीसाठी सिडकोकडे पाठविला आहे. मंजुरी मिळताच बांधकाम सुरू होईल, असे आश्वासन महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कटेकर यांनी सांगितले.