पालिकेच्या मॅरेथॉनवर शिंदे गटाची छाप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : कोरोनानंतर पाच वर्षांनी ठाण्यात पालिकेने आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा पार पडली, मात्र या मॅरेथॉनवर सर्वत्र शिवसेना शिंदे गटाचीच छाप पाहायला मिळाली. उपक्रमावर अपेक्षेप्रमाणे विरोधकांचा बहिष्कार होता, पण केंद्र आणि राज्यात मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारीही गैरहजर राहिले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
आगामी ठाणे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यावर्षी प्रशासनामार्फत सत्ताधाऱ्यांनी वर्षा मॅरेथॉनचा घाट घातला. वास्तविक तत्कालीन महापौर दिवंगत सतीश प्रधान यांनी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन सुरू केली होती. गेल्या ३० वर्षांपासून ही मॅरेथॉन महापौरांच्या हस्ते आयोजित केली जाते, पण सध्या महापालिका प्रशासकाच्या हाती आहे. महापौर नसल्याने ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. तेव्हापासून ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मॅरेथॉनसाठी निधी उभारतानही पालिकेच्या नाकीनऊ आले होते, पण अखेर १० ऑगस्टला पावसाच्या गैरहजेरीत ही वर्षा मॅरेथॉन पार पडली.
सकाळी नियोजित वेळेत वर्षा मॅरेथॉनला पालिका मुख्यालयापासून सुरुवात झाली. त्यासाठी मुख्यालयाबाहेर भव्य मंडप बांधण्यात आला होता. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन झाले. या वेळी व्यासपीठावर खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, सचिव राम रेपाळे यांच्यासह पक्षातील अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वास्तविक या स्पर्धेची निमंत्रण पत्रिका भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनाही पाठवण्यात आले होते. त्यांच्यासह मित्रपक्षातील नजीब मुल्ला आणि माजी नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले होते.
शहरात झळकलेल्या फलकांवर निमंत्रितांचे फोटोही लावण्यात आले होते, पण प्रत्यक्षात व्यासपीठावर शिवसेना शिंदे गटाव्यतरिक्त कोणत्याच पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित नव्हते. उलट हा उपक्रम ठाणे महापालिकेचा असला तरी स्पर्धेच्या पूर्ण धावपट्टीच्या ठिकाणी शिवसेनेचे झेंडे लागले होते. स्पर्धा आयोजनापासून ते प्रत्यक्ष उपक्रमाच्या दिवसापर्यंत शिवसेना शिंदे गट वगळता कोणताही राजकीय पक्ष सहभागी झाला नव्हता. यावरून मित्रपक्षांतील काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ‘सकाळ’कडे नाराजी व्यक्त केली. नेहमीप्रमाणे वर्षा मॅरेथॉन शिवसेनेने हायजॅक केल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपमध्ये प्रचंड नाराजी
आगामी ठाणे महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असले तरी भाजपला स्वतंत्र निवडणूक लढायची आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या कोणत्याही कार्यक्रम किंवा उपक्रमांना येथील स्थानिक पदाधिकारी जाणे टाळत असल्याचे दिसत आहे. यामध्ये वर्षा मॅरेथॉनही अपवाद राहिली नाही. आमदार संजय केळकर बाहेरगावी आहेत, पण आमदार निरंजन डावखरे, भाजपचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवकही मॅरेथॉनपासून चार हात लांब राहिले. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही गैरहजेरी लावली, पण मित्रघटकातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि सत्ताधाऱ्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नजिब मुल्ला यांनीही पाठ फिरवल्याने चर्चा रंगल्या आहेत.