गणेशोत्सवासाठी कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारात ग्रुप बुकिंगचा पर्याय

गणेशोत्सवासाठी कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारात ग्रुप बुकिंगचा पर्याय

Published on

मागेल त्यांना, मागेल तिथे जाण्यासाठी स्वतंत्र एसटी
गणेशोत्सवासाठी कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारात ग्रुप बुकिंगचा पर्याय
संतोष दिवाडकर
कल्याण, ता. १० (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या काळात ठाणे, मुंबई, पालघर व इतर विभागातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने मोठ्या प्रमाणात नियोजन केले आहे. खास कोकणातील चाकरमान्यांसाठी २३ ऑगस्टपासून पाच हजार जादा बस सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारातूनही ११८ जादा गाड्यांचे आरक्षण झाले असून, त्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची सोय होणार आहे, परंतु ज्यांना आरक्षण मिळू शकले नाही, अशा लोकांसाठी अजूनही गट आरक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे.
कल्याण एसटी आगारातून एकूण ३० जादा गाड्यांचे ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने आरक्षण झाले आहे, तर विठ्ठलवाडी एसटी आगारातून एकूण ८८ जादा गाड्यांचे आरक्षण झाले आहे. ज्यांना आरक्षणाचा लाभ घेता आला नाही, अशा प्रवाशांसाठी दोन्ही आगारात गट आरक्षण सुरू करण्यात आले आहे. २२ जुलैपासून सुरू झालेल्या या आरक्षणाअंतर्गत शेकडो एसटी गाड्यांचे आरक्षण झाले असून, अजूनही चाकरमानी या पर्यायाचा लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे गटाने मागणी केलेल्या वेळेनुसार बस प्रवाशांना घेण्यासाठी पोहोचते. आतापर्यंत कल्याण-विठ्ठलवाडी एसटी आगारात शेकडो एसटी बसचे गट आरक्षण झालेले असून, उर्वरित आरक्षण राजकीय पक्षांमार्फतही होत असल्याची माहिती विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी दिली आहे.

असे करा आरक्षण
गट आरक्षण हे केवळ एका सीट पुरते नसून संपूर्ण एसटी बसच आरक्षित करावी लागते. यासाठी ४० प्रवाशांच्या नावांची यादी, आयडी प्रूफसह आगारात येऊन जमा करावी लागते. याचवेळी बस कुठून कुठपर्यंत हवी आहे, हेदेखील संबंधित गटाला नमूद करावे लागते. मागणी केलेल्या ठिकाणांच्या अंतरानुसार प्रति प्रवासी तिकीटदर आकारला जात असून, एकत्रितपणे ४० तिकिटांचे पैसे त्याच क्षणी भरून गट आरक्षण यशस्वीरित्या पूर्ण होते.

गट आरक्षणाला एसटीच्या इतर योजनाही लागू
ही योजना महाराष्ट्रात विविध सण उत्सव आणि हंगामी काळात राबवली जाते. गट आरक्षणाला महामंडळाच्या इतर योजनाही लागू होतात. एसटी प्रवासात महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना असलेल्या महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक व अमृत ज्येष्ठ नागरिक योजनाही गट आरक्षणाला लागू होतात. यानुसार ५० ते १०० टक्के सवलत दरही या योजनेत लागू आहे. उदा. ७५ वर्षांवरील संपूर्ण ४० ज्येष्ठ नागरिकांनी जर एकाच बसचे गट आरक्षण केले असेल, तर ती संपूर्ण बस मोफतपणे सोडणे कोणत्याही एसटी आगाराला बंधनकारक असेल.

Marathi News Esakal
www.esakal.com