ह्यांना ना जनाची ना मनाची
ह्यांना ना जनाची, ना मनाची
वाहतूक कोंडीवरून मनसे नेते राजू पाटील यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० ः कल्याण-शिळ रस्त्यावर मोठा गाजावाजा करून पलावा सिटीजवळ उड्डाणपूल सुरू करण्यात आला. पण परिस्थिती जैसे थे आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीही पलावा सिटीजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीवर मनसे नेते राजू पाटील यांनी ‘ह्यांना ना जनाची, ना मनाची’ असं म्हणत टीका केली आहे.
कल्याण-डोंबिवलीकडे येणाऱ्या कल्याण-शिळ फाट्यावर वाहतूक कोंडी ही काही नवीन नाही. पण या वाहतूक कोंडीवर तोडगा काढत पलावा सिटीजवळ नवीन उड्डाणपूल सुरू करण्यात आला, मात्र हा पूल उद्घाटनापासून वादात अडकला होता. दुसऱ्याच दिवशी पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. तर शनिवारी (ता. ९) रक्षाबंधनाच्या दिवशीही पलावा सिटीजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. चार ते पाच तास गाड्या या एकाच जागी उभ्या होत्या. पुलावर आणि जुन्या मार्गावर दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. कल्याण डोंबिवली शहरातील अंतर्गत रस्त्यावरदेखील मोठी वाहन कोंडी झाली होती. यावर मनसेचे नेते राजू पाटील यांनी एक्सवर पोस्ट करीत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
राजू पाटील यांची पोस्ट
या वाहतूक कोंडीवर मनसेचे नेते राजू पाटील यांनी सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट लिहिली. रक्षाबंधनाच्या दिवशी नागरिकांना ट्रॅफिकचं आंदण आहे. वर्षानुवर्षे तोच रस्ता, तेच ट्रॅफिक, तीच घुसमट आणि तीच मागणी. आता आम्हालाही त्याच त्या मुद्द्यावरून सरकारला शालजोडीत द्यायला लाज वाटू लागली आहे. पण यांना नागरिकांच्या जीवाची, वेळेची आणि जीवनाची काहीही एक पडलेली नाही. रस्ते रुंदीकरण केले, कितीतरी ब्रिज बांधले, त्याचा मलिदा खाऊन झाला. पुन्हा रस्ते आणि पूल दुरुस्त करण्याची वेळ आली. म्हणजे पुन्हा मलिदा खाण्याची संधी उपलब्ध झाली, अशी टीका पाटील यांनी केली.