गायमुख घाटाची दुरुस्ती ७० टक्के
गायमुख घाटाची दुरुस्ती ७० टक्के
उर्वरित कामासाठी पुन्हा तीन दिवसांचा ब्लॉक; प्रवाशांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : गायमुख घाट मार्गावरील दुरुस्तीचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित ३० टक्के कामासाठी पुन्हा तीन दिवसांचा ब्लॉक घेण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. केवळ या मार्गावरील खड्डे न बुजवता प्रशासनाने तीन दिवसांचा ब्लॉक घेत रस्ता खरवडून त्यावर खडी, डांबराचा थर चढवला आहे. आता त्यावर अंतिम मास्टिकचा थर चढवल्यानंतर ही दुरुस्ती १०० टक्के फत्ते होणार आहे. मात्र त्यासाठी पुन्हा सलग तीन दिवसांच्या ब्लॉकची गरज भासणार आहे. यासाठी या आठवड्यात येणाऱ्या १५ ऑगस्टपासूनच्या सलग सुट्ट्यांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील आणि ठाणे-पालघरला जोडणारा गायमुख मार्ग गेल्या काही महिन्यांपासून येथील खड्ड्यांमुळे वादात सापडला आहे. हा घाटमार्ग मजबूत करण्यासाठी अनेक दुरुस्तीचे प्रयोग करण्यात आले; मात्र सर्व प्रयत्न खड्ड्यात गेले. पावसाळ्यात या मार्गाची अवस्था दयनीय झाली. अवघ्या अर्ध्या किलोमीटरच्या प्रवासासाठी अडीच ते तीन तास रखडपट्टी सहन करावी लागत होती. यासंदर्भात वारंवार टीकेची झोड उठत असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात येत नव्हती. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पालघर दौऱ्यादरम्यान या मार्गाचा अनुभव आला. त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर शुक्रवारी (ता. ८) या मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली.
घाटमार्गाचे रुंदीकरण होत नाही तोपर्यंत कितीही दुरुस्ती केली तरी ती व्यर्थ जाणार आहे. त्यामुळे आधी या मार्गावरील केवळ खड्डे बुजवण्याचे ठरवण्यात आले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा या रस्त्याची पाहणी करीत मास्टिक तंत्रज्ञान वापरण्याचे आदेश दिले. त्यानुसार ८ ते १० ऑगस्ट या कालावधीमध्ये हे काम फत्ते करण्याचे ठरले. त्यानुसार खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, पालिका आयुक्त सौरभ राव आणि मिरा-भाईंदर पालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली हे काम करण्यात. यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावरील आतापर्यंत दुरुस्तीचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, ३० टक्के दुरुस्ती शिल्लक आहे.
मास्टिकमुळे मजबुती
गायमुख रस्ता दुरुस्त करताना तो खोदून त्यावर सर्वप्रथम खडीचा थर टाकण्यात आला आहे. त्यानंतर त्यावर डांबराचे दोन थर अंथरण्यात आले आहेत. मात्र हे काम आणखी मजबूत व्हावे किंबहुना गायमुख रुंदीकरणापर्यंत रस्ता रहदारीसाठी सुखकर असावा, यासाठी आता त्यावर मास्टिकचा थर टाकण्यात येणार आहे. त्यानंतरच हे काम फत्ते होणार आहे.
रहदारीसाठी रस्ता खुला
गायमुख रस्ता दुरुस्तीसाठी शुक्रवारी पहाटेपासून ते रविवारी मध्यरात्रीपर्यंत या मार्गावरील रहदारी टप्प्याटप्प्याने बंद ठेवत ब्लॉक घेण्यात आला होता. यादरम्यान सर्वप्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घातली होती. मास्टिकचे काम शिल्लक असले तरी आता हा रस्ता रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे काही अंशी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
अर्धा किलोमीटर रस्ता मजबूत
घाट रस्त्याच्या चढणीला असलेला मार्ग तापदायक ठरला होता. उर्वरित रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक असलेला अर्धा किलोमीटरचा रस्ता मजबूत केला आहे. उर्वरित मार्गावर पडलेले खड्डेही बुजवण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
लवकरच बैठक
उर्वरित ३० टक्के कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काम केव्हापासून सुरू करायचे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या ब्लॉकवर चर्चा होईल, अशी माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.
कामाचा तपशील
रस्त्यावर खडी + डांबराचे थर
आता मास्टिकचा अंतिम थर टाकला जाणार
पावसाळ्यातील तातडीची उपाययोजना म्हणून काम सुरू
वाहतूक स्थिती :
रस्ता सध्या वाहतुकीसाठी खुला
ब्लॉकदरम्यान अवजड वाहनांवर बंदी होती
काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा
महत्त्वाच्या व्यक्तींची भेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावर कामाला गती
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ व अन्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम
पुढील टप्पा
१५ ऑगस्टच्या सुट्ट्या लक्षात घेऊन पुढचा ब्लॉक होण्याची शक्यता
उर्वरित ३० टक्के कामासाठी लवकरच बैठक आयोजित
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.