एमआयडीसीच्या जमिनीवर अतिक्रमण

एमआयडीसीच्या जमिनीवर अतिक्रमण

Published on

एमआयडीसीच्या जमिनीवर अतिक्रमण
भूमाफियांकडून झोपड्यांची उभारणी; कारवाईची मागणी
वाशी, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीच्या मोकळ्या जमिनींवर अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. यादव नगर, इलठण पाडा, अडवली भुतवली, तुर्भे या भागांत भूमाफियांचा अनधिकृत झोपड्या उभारून त्या गरजू लोकांना विकण्याचा धंदा चांगलाच फोफावला आहे. गतवर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर तसेच पावसाळ्याचा फायदा घेत झोपड्या उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात कारवाईला रोख लागत असल्याने भूमाफियांना वाव मिळत आहे.
या अतिक्रमित झोपड्यांना बेकायदेशीर पाणी जोडण्या दिल्या जात आहेत, तर जुन्या झोपडपट्टीधारकांनी दुमजली बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे केवळ शहरी रचनेचा समतोल बिघडत नाही, तर निवडणुकांमध्ये मतदारसंख्या वाढण्याच्या आशेने काही राजकीय नेते या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचेही आरोप करण्यात येत आहेत. शिवाय झोपडपट्टीतील नागरिकांना एसआरए योजनेचे गाजर दाखवून अतिक्रमणाला प्रोत्साहन दिले जात आहे.
एमआयडीसीने यापूर्वी अनेकदा अतिक्रमणावर कारवाई करून मोकळे भूखंड कंपन्यांना विकले आहेत, मात्र कोरोना महामारीनंतर पुन्हा झोपड्यांची वाढ झाली आहे. अनेक घरे दोन ते तीन लाख रुपयांत विकली जात असून, त्यात फसवणुकीच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. शासनाने २०१० पर्यंतच्या झोपड्यांना वैधता दिल्यामुळे भूमाफियांना भविष्यात मुदतवाढ मिळेल, या अपेक्षेने अतिक्रमणाचा वेग वाढवला आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे औद्योगिक विकासावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन, एमआयडीसी, सिडको आणि पालिका यांनी समन्वय साधून भूमाफियांच्या कारवायांवर तातडीने अंकुश ठेवणे अत्यावश्यक आहे अन्यथा नवी मुंबईतील औद्योगिक जमिनी कायमस्वरूपी अतिक्रमणाच्या विळख्यात अडकण्याचा धोका आहे. एमआयडीसीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांच्या जमिनीवरील अतिक्रमणावर पोलिस बंदोबस्तासह कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.
...................
नवी मुंबई महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी सांगितले, की संबंधित प्राधिकरणांनी त्यांच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी स्वतः लक्ष ठेवावे. तसेच एमआयडीसीने कारवाई सुरू केल्यास पालिका त्यांना पूर्ण सहकार्य करेल.
- डॉ. कैलास गायकवाड, अतिक्रमण नियंत्रण उपआयुक्त, नवी मुंबई महापालिका
...............

Marathi News Esakal
www.esakal.com