खोपोलीत निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू
खोपोलीत निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नगरपालिकेचा गुलाल उधळणार; चौरंगी लढत निश्चित
खोपोली, ता. १० (बातमीदार) ः तब्बल तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अखेर राज्य सरकार व निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. न्यायालयीन व कायदेशीर अडथळे दूर झाल्याने नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या खोपोली नगरपालिकेत यंदाची निवडणूक विशेष गाजणार असून, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे चौरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे, भाजप-आरपीआय आमदार प्रशांत ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली तसेच स्वबळावर लढण्याची तयारी असलेल्या काही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे, याशिवाय शेकाप-काँग्रेस-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीकडूनही एक सक्षम उमेदवार उभा करण्याची व्यूहरचना सुरू आहे.
नगराध्यक्षपदासाठी संभाव्य दावेदारांमध्ये शिवसेना (शिंदे गट)कडून माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील आणि माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून यशवंत साबळे, त्यांचे पुत्र विक्रम साबळे किंवा महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, माजी गटनेते मंगेश दळवी किंवा महिला आरक्षण लागल्यास वैशाली जाधव या उमेदवारांची नावे पुढे आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख यांचे नाव अग्रस्थानी आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पक्षांतराची शक्यता वर्तवली जात असून, ओपन किंवा ओबीसी आरक्षण असल्यास इच्छुकांची रांग वाढणार आहे. यामुळे वरिष्ठ नेत्यांना उमेदवार ठरविताना मोठी कसरत करावी लागेल. सध्याच्या परिस्थितीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. विशेषत: दत्ताजी मसुरकर निवडणूक लढले, तर त्यांचा अनुभव आणि राजकीय कौशल्यामुळे सामना अत्यंत चुरशीचा होईल. दुसरीकडे, भाजप-आघाडी व महाविकास आघाडीकडून एकच प्रभावी उमेदवार उतरल्यास खोपोलीत धक्कादायक निकाल लागू शकतो.
.......
उमेदवारीचे संभाव्य दावेदार
शिवसेना (शिंदे गट) – माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे
भाजप – यशवंत साबळे, विक्रम साबळे, महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, माजी गटनेते मंगेश दळवी, महिला आरक्षण असल्यास वैशाली जाधव
महाविकास आघाडी – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख
...................
आरक्षण आणि पक्षांतराचा मुद्दा
नगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षांतराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ओपन किंवा ओबीसी आरक्षण असल्यास सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या वाढेल. त्यामुळे उमेदवार निश्चित करताना पक्ष नेतृत्वाला मोठी कसरत करावी लागेल.