धारावीतील मडक्‍यांना दहीहंडीत पसंती

धारावीतील मडक्‍यांना दहीहंडीत पसंती

Published on

धारावीतील मडक्‍यांना दहीहंडीत पसंती
पिढ्यानपिढ्या रहिवाशांनी जोपासला व्यवसाय
संजय शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
धारावी ः श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला काही दिवसांवर आल्याने सर्वत्र या सणाची जोरदार तयारी सुरू आहे. दहीहंडीसाठी लागणारी मडकी बनवण्याचे काम धारावीतील कुंभारवाडा येथे गेल्‍या अनेक वर्षांपासून केले जाते. सध्या मडक्यांवरील कलाकुसरीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, विक्रीसाठी मडकी तयार झाली आहेत, असे विक्रेत्‍यांनी सांगितले.
प्लॅस्‍टिकमुळे मातीचे साहित्य वापरणे पहिल्यापेक्षा कमी होत चालले आहे. मात्र दहीहंडीसाठी अजून तरी मातीची मडकी वापरली जातात. श्रावण महिना सुरू होताच विविध सणांना मोठ्या उत्साहात सुरुवात होते. धारावीत तर सणांचा काळ म्हणजे उत्साह व धावपळीचा असतो. यातीलच तरुणाईला सर्वात आकर्षित करणारा सण म्हणजे गोपाळकाला. श्रीकृष्‍ण जयंती शुक्रवारी (ता. १५), तर गोपाळकाला सण शनिवारी (ता. १७) साजरा करण्यात येणार आहे. यासाठी गोविंदा पथकांचा जागोजागी सराव सुरू आहे. गोपाळकाल्याला लागणाऱ्या हंडी (मडकी) मातीच्या बनवल्या जातात.
धारावीतील कुंभारवाड्यात कुंभार समाजाचे लोक हा व्यवसाय करीत आहेत. यातील काही कुटुंबीय हे मडकी बनवण्याचा धंदा पिढ्यानपिढ्या करीत आहेत, काही कुटुंबे या तयार मडक्यांवर कलाकुसर करण्याचे काम करीत आहेत. पूर्वी कच्ची हंडी रंगवण्यात येत होती., परंतु बदलेल्या काळानुसार सध्या ऑइलपेंटने मडक्यांना रंग दिला जातो. हे सर्व काम अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. दहीहंडीच्या किमान दोन महिने अगोदरपासून या कामाला सुरुवात केली जाते.

तरुण-तरुणींचा हातभार
कुंभारवाड्यातील तरुण-तरुणी या शाळा, महाविद्यालयात शिकत या कामात कुटुंबांना हातभार लावतात. पूर्ण कुटुंबीय मिळून हे काम पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कामात व्यस्त असतात. सुमारे १०० पेक्षा जास्त परिवार आजच्या घडीला मडक्यांवर कलाकुसरीचे काम करीत आहेत. या व्यवसायामध्ये नफा होत नसतानाही आम्ही दरवर्षी दहीहंडीसाठी मडके बनवत असतो. असे येथील विक्रेत्यांनी सांगितले.

पोटाला चिमटा काढून जोपासली परंपरा
येथील महेश भाई अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहेत. त्यांचे भाऊ व कुटुंबाने गेल्या काही दिवसांपासून या कामाला सुरुवात केली. दहीहंडीच्या आदल्या दिवसांपासून हंडीच्या विक्रीला जोर येतो. अनेकदा दहीहंडीच्या दिवशी हंडी विक्रीसाठी उपलब्ध नसते. या व्यवसायात म्हणावा तसा आर्थिक फायदा होत नसतानाही इथले लोक आपल्या पूर्वजांनी सुरू केलेले काम बंद पडू नये, यासाठी पोटाला चिमटा घेऊन काम करीत आहेत.

होलसेलमध्ये १०० ते ३५० रुपये दर
गोविंद चित्रोडा यांच्या घरातील लहान-थोर सर्वजण या कामात गुंतलेले आहेत. तयार मडकी गोविंद चित्रोडा मुंबईतील अन्य भागांत विक्री करतात. होलसेलमध्ये किमान १०० ते ३५० रुपयांना हंडी विक्री होत असल्याचे त्‍यांनी सांगितले. किरकोळ विक्रीमध्ये १७५ ते ५५० रुपयांपर्यंत हंडीची विक्री होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com