पर्यावरणपूरक मखरला पसंती
पर्यावरणपूरक मखरला पसंती
डोंबिवलीच्या प्रदर्शनाला देशविदेशातून मागणी
डोंबिवली, ता. १३ (बातमीदार) : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना बाजारपेठा विविध रंगीबेरंगी सजावटीच्या मखरांनी सजू लागल्या आहेत. यंदा मात्र थर्माकोल आणि प्लॅस्टिकला फाटा देत पर्यावरणपूरक मखरांना पसंती पाहायला मिळत आहे. हे मखर केवळ डोंबिवली व ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर मुंबई, कोकण, कर्नाटक व अगदी अमेरिका, लंडन, जर्मनीसारख्या देशांमध्येही पोहोचत आहेत. पूर्वी घरी मखर तयार करण्याची परंपरा होती; मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, लोकांचे पारंपरिकतेकडे असलेले प्रेम टिकवून ठेवण्यासाठी तयार पर्यावरण मखरांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
निशिकांत मोडक हे डोंबिवलीतील प्रसिद्ध पर्यावरणपूरक मखरविक्रेते, गेल्या ३४ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी सर्वात पहिले पर्यावरणपूरक मखरांचे प्रदर्शन डोंबिवलीत भरवले होते. आज त्यांच्या हस्तकलेची दखल देशविदेशात घेतली जाते. थर्माकोल बंदीनंतर मखरनिर्मितीत क्रांती आली. कारागिरांनी कागद, बांबू, चिकणमाती, उसाची पाने, नक्षीदार कापड, कापूस, व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून विविध डिझाइन्स तयार केल्या आहेत.
मखरांमधील विविधता
काच वापरून बनवलेले ‘शिशमहाल’ प्रकार
कृत्रिम फुलांची सजावट
स्वामी समर्थांच्या वडाच्या झाडाखालील आसन
विठूरायाची पार्श्वभूमी
शिव व सरस्वती आसन
प्राचीन मंदिरांच्या प्रतिकृती
बांबूपासून तयार केलेली रंगीबेरंगी मखरे
राम मंदिर डिझाइन
कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या पार्श्वभूमीवरील आसन
किंमत आणि विक्री
इको-फ्रेंडली मखरांची किंमत ९०० रुपये ते २० हजार रुपये दरम्यान आहे. प्रत्येक मखरात एक खास भारतीयतेचा आणि निसर्गाशी सुसंगततेचा अनुभव मिळतो.
विदेशांतही मागणी
मखरांची मागणी केवळ ठाणे जिल्ह्यापुरती मर्यादित नसून, ती मुंबई, कोकण, मालवण, रत्नागिरी, कर्नाटकातील हुबळी आणि बंगळूर या भागांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे ही मखरे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडन, जर्मनी अशा देशांमध्येही ग्राहक खरेदी करत आहेत.
कारागिरांना रोजगार
‘‘पूर्वी थर्माकोल मखरे बनवत होतो, पण बंदी आल्यावर पर्याय शोधत, आम्ही इको-फ्रेंडली मखरे बनवायला सुरुवात केली. हे एक लघु उद्योगाचे रूप घेत आहे,’’ असे निशिकांत मोडक सांगतात. या मखरांच्या निर्मितीत आदिवासी महिलांचादेखील सहभाग आहे. बांबूपासून बनवलेली मखरे खास आदिवासी समाजाकडून तयार केली जातात, ज्यामुळे दोन महिने रोजगार मिळतो. वर्षभर मेहनत करून ही मखरे एक महिन्याच्या विक्रीत विकली जातात. निशिकांत मोडक यांच्या मखर प्रदर्शनाला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक भेट देतात. पर्यावरण जपणारे, पुन्हा वापर करता येणारे आणि पारंपरिक डिझाइन असलेली ही मखरे बाजारात वेगळी ओळख निर्माण करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.