जिल्ह्यात फुटणार हजारो दहीहंडी
यंदा ढाक्कुढुक्कुम जोरात
जिल्ह्यात फुटणार हजारो दहीहंडीः पोलिस प्रशासन सज्ज
अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः गोपाळकाला अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी आकर्षक मातीची मडकी विकण्यास आली आहेत. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्ष आणि मंडळानी दहीहंडी स्पर्धांचे आयोजन केले आहे. जिल्ह्यात यावर्षी एक हजार ९१७ सार्वजनिक तर तब्बल सात हजार ०६२ खासगी दहीहंडी फोडण्यात येणार आहेत. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिस प्रशासनानेही तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
जिल्ह्यात अनेक वर्षांपासून ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याची परंपरा आजही उत्साहाने जपली जात आहे. बदलत्या काळानुसार या परंपरेला आता स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे लहानांपासून अगदी ४० वर्षे वयोगटातील पुरुषही या दहीहंडी स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. त्याचप्रमाणे महिला पथकही आता दहीहंडी उत्सवात सहभागी झाल्या आहेत. या वातावरणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिस प्रशासनानेही कंबर कसली आहे. यावर्षी शनिवारी (ता.१६) गोपाळकाला साजरा करण्यात येणार असून जिल्ह्यात एक हजार ९१७ सार्वजनिक व सात हजार ६२ खासगी दहीहंडी फोडण्यात येणार आहेत.
पोलिसांचा बंदोबस्त
गोपाळकाला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १५० पोलिस अधिकारी, ९५० अंमलदार, ३५० होमगार्ड, एसपीआरएफची १ कंपनी व ७३ वाहतूक अंमलदार तैनात करण्यात येणार आहेत.
सार्वजनिक दहीहंडी: १९१७
खासगी दहीहंडी: ७०६२
पुरुष गोविंदा पथक : ३६
महिला गोविंदा पथक: ६
बक्षिसांची लयलूट
१.जिल्ह्यात राजकीय पक्षांनीही लाखोंची बक्षिसे असणारी दहीहंडी स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये तालुक्यात भाजपकडून तब्बल दोन लाख २२ हजार रुपये पुरुष विजेत्या गोविंदा पथकाला तर एक लाख ११ हजार रुपये महिला विजेत्या गोविंदा पथकाला देण्यात येणार आहेत.
२. शेकाप पुरस्कृत दहीहंडी स्पर्धेत दहीहंडी फोडणाऱ्या पुरुषांच्या पथकाला प्रथम क्रमांकाचे रोख एक लाख ३१ हजार १११ रुपये व महिला प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पथकाला ५१ हजार १११ रुपये व चषक देण्यात येणार आहे.
३. मधूशेठ ठाकूर सामाजिक संस्था व प्रवीण ठाकूर, रवि ठाकूर, पिंट्या ठाकूर व अमित नाईक मित्र मंडळातर्फे पुरुष गोविंदा पथकाला एक लाख ५१ हजार तर महिला विजेत्या गोविंदा पथकाला ५० हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
आपले महाराष्ट्र राज्य हे सण-उत्सवप्रिय राज्य आहे. त्यात रायगड जिल्ह्यात गोपाळकाला, गणेशोत्सवारखे सण तर म्हणजे उत्साहाने साजरे होतात. अशा वेळी जिल्हा प्रशासनानेही सज्जता ठेवली आहे. मोठ्या दहीहंडीच्या ठिकाणी आरोग्य विभाग व पोलिसांची एक टीम तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी एकत्र येऊन उत्साहात सण साजरा करावा.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.