मालमत्ता करावरून रणकंदन
मालमत्ता करावरून जनरोष
पनवेल पालिकेवर ‘मविआ’चा मोर्चा
कामोठे, ता. १३ (बातमीदार) : शास्ती नाही, मालमत्ता कर माफ करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी पनवेल महापालिकेवर पोलखोल मोर्चा काढण्यात आला. भरपावसात हजारोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणला.
पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. पनवेल एसटी स्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून लाईन आळीमार्गे महापालिकेवर मोर्चा धडकला. पनवेल महापालिका ड वर्गाची असताना अ वर्गातील पालिकांच्या दरानुसार करआकारणी करीत आहे. तसेच मालमत्ता करावरील शास्ती माफ केल्याचे जाहीर करून नागरिकांना संभ्रमात टाकण्याचे काम केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.
-----------------------------------
ऑक्टोबर २०१६मध्ये पनवेल महापालिकेची स्थापना झाली. महापालिकेत पूर्वालक्षीची पनवेल नगर परिषद व पनवेल तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधील एकूण २९ गावांचा समावेश करण्यात आला. महापालिका क्षेत्र सुमारे ११२ स्क्वेअर किलोमीटर विस्तारलेले आहे. यापैकी १०५ स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र सिडकोने विकसित केले आहे. सिडको वसाहतीमध्ये नागरिकांनी २०१६ पासून मार्च २०२३ पर्यंत सेवा शुल्क भरले आहे. पण पालिकेने सिडको वसाहतीत विकासकामे केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
----------------------------------------
गणेशोत्सवानंतर पुन्हा हल्लाबोल
गणेशोत्सवानंतर महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांतील कामकाज बंद पाडून मुख्यालयावर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी मोर्चात दिला. तर मालमत्ता कराबाबतची फेररचनेसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, नगरविकास मंत्री व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठकीचे निवदेन पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना दिले.
----------------------------------------
‘कॉलनी फोरम’ची आंदोलनाकडे पाठ
पनवेल पालिकेविरोधातील आंदोलनात महाविकास आघाडी, मनसे तसेच विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या. मोर्चेकऱ्यांचा उत्साह भरपावसातही कायम होता. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. महापालिका परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. मुख्यालयासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषणे झाली. आंदोलनाकडे कॉलनी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती.
-----------------------------------------
महायुती सरकारचे नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. पनवेल महापालिकेने नागरिकांवर अवाजवी कर लादलेला आहे. मालमत्ता कराची फेररचना होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.
- संजोग वाघेरे पाटील, उपनेते शिवसेना
--------------------------------------
पनवेल महापालिका ठेकेदारांना पोसत आहे. ठेकेदारांना रस्त्यांची कामे देण्यासाठी महापालिका शास्ती आणि अवाजवी मालमत्ता कर आकारत आहे.
- योगेश चिले, प्रवक्ता, मनसे
---------------------------------
पनवेल महापालिकेने दुहेरी कर लावून सिडको वसाहतीमधील नागरिकांवर अन्याय केला आहे. मालमत्ता कराविरोधातील न्यायालयीन लढाई सुरू आहे. जनतेच्या बाजूने हा निकाल लागेल, असा विश्वास आहे.
- महादेव वाघमारे, याचिकाकर्ते
००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.