कोकणातील बाल्या डान्स जपतोय परंपरा
कोकणातील बाल्या डान्स जपतोय परंपरा
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच सराव सुरू
तळा, ता. १४ (बातमीदार) ः कोकणातील पारंपरिक ‘बाल्या डान्स’ ही नृत्यकला सांस्कृतिक वारशाचे जतन करत आहे. गौरी-गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण असून, गणरायाच्या आगमनाच्या तयारीत या नृत्यप्रकाराला विशेष महत्त्व दिले जाते. नागपंचमीला नारळ फोडून या कलेच्या सरावाची औपचारिक सुरुवात होते. गावदेवीच्या मंदिरात गावकरी व नृत्यकला पथकातील सदस्य एकत्र जमतात आणि देवी-देवतांना साकडे घालून नृत्याचा प्रारंभ केला जातो.
या कलेत गायक, वस्ताद, ढोलकीपटू, झांजवादक यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. सरावाच्या वेळी गायक गाण्याच्या चाली, गती, रती ठरवतात; तर ढोलकीपटू ताल बसवतात. अकरा पोशाखधारी मुले रंगीबेरंगी पोशाख घालून नृत्यात सहभागी होतात. नृत्याच्या मध्यभागी ‘बुवा’ असतो, तर त्याच्या आसपास सहकारी, ढोलकी व झांज वाजविणारे कलाकार असतात. गणा धाव रे, गणा पाव रे, तुझ्या नामाचा छंद मला दाव रे, अशा ओव्यांसह गवळण, अभंग, पौराणिक प्रश्नोत्तरे, जुगलबंदी यांचा कार्यक्रम रंगतो. या वेळी प्रेक्षक नृत्याचा मनसोक्त आनंद घेतात. कोकणातील या नृत्यकलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोजगारानिमित्त मुंबईसारख्या शहरात गेलेले कोकणवासीही आपल्या परिसरात ही कला जिवंत ठेवतात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सभागृहात आणि मैदानात सराव सुरू असतो.
..................
सांस्कृतिक वारशाचे जतन
या कलेतून परंपरा, भजन, नामस्मरण यांचा प्रचार होतो, तर काही कलाकारांना शासन मानधन देऊन गौरविते. गावातील दानशूर व्यक्ती नृत्यकला पथकासाठी फॅन्सी ड्रेस पुरवतात.
ही नृत्यपरंपरा नवरात्रोत्सवापर्यंत चालते. शेतकरी व कष्टकरीवर्ग दिवसभर शेतीची कामे आटोपल्यानंतर या कार्यक्रमातून विरंगुळा घेतात. पुरुष, महिला, युवक-युवती उत्साहाने सहभागी होत असून, बाल्या डान्स कोकणातील सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून आजही तितकाच लोकप्रिय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.