मिरा भाईंदरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी जागा हस्तांतरणास मान्यता

मिरा भाईंदरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी जागा हस्तांतरणास मान्यता

Published on

उत्तनमध्ये होणार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय
जागा हस्तांतरणास मान्यता; तीन वर्षांत कार्यालय बांधणार

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरासाठी मंजूर केलेल्या स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी आता कायमस्वरूपी जागा मिळाली असून, उत्तन येथील ०.४७० हेक्टर सरकारी जमीन परिवहन विभागाकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात येणार आहे. महसूल विभागाने याला मान्यता दिली असून, त्याचे आदेश गुरुवारी (ता. १४) जारी करण्यात आले.

मिरा-भाईंदरसाठी यावर्षी २८ फेब्रुवारीला स्वतंत्र उपप्रादेशिक कार्यालयाची (एमएच-५८) घोषणा करण्यात आली. त्यानंतर २ एप्रिलपासून मिरा रोडच्या हटकेश भागात त्याचे तात्पुरते कार्यालय सुरू केले; मात्र या कार्यालयासाठी कायमस्वरुपी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी उत्तन येथे सरकारी जागेची मागणी केली होती. उत्तन येथील सर्व्हे क्र. २०३/३ येथील सुमारे आठ हेक्टर जागेपैकी ०.४७० हेक्टर सरकारी जमीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला हस्तांतर करण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून महसूल विभागाकडे पाठविला होता. या प्रस्तावावर निर्णय देत जागा हस्तांतर करण्यास महसूल व वन विभागाने मान्यता दिली आहे.

मिरा-भाईंदरमधील वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सुरुवातीला येथील वाहनांसाठी मिरा रोडच्या हटकेश येथे आरटीओचे एक उपकेंद्र सुरू केले होते; मात्र वाहनांची नोंदणी तसेच व्यावसायिक वाहनांच्या चाचण्यांसाठी नागरिकांना ठाण्यालाच जावे लागत होते. त्यात वाहनचालकांचा वेळ, पैसा व इंधन वाया जात असते. यासाठी मिरा-भाईंदरमध्येच उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्याची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरवा केला. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारीत मिरा-भाईंदरसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक कार्यालय मंजूर करण्यात आले. आता उत्तन येथील मंजूर झालेल्या सरकारी जागेवर आरटीओचे कायमस्वरूपी स्वतंत्र कार्यालय बांधले जाणार आहे. त्या ठिकाणी वाहन नोंदणी, वाहन तपासणी, वाहनचालक परवाना आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच वाहन तपासणीसाठी आवश्यक लांबीचा ट्रॅक, वाहनचालक परवान्याची चाचणी घेण्यासाठी मोकळी जागा आदी पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

जागा हस्तांतरणाला मान्यता मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडेल. ऑक्टोबर महिन्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात येईल. त्यानंतर आगामी तीन वर्षांत कार्यालयाची इमारत बांधण्यात येईल.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
...................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com