वाढवण बंदर पाणीपुरवठा योजनेला गती
वाढवण बंदर पाणीपुरवठा योजनेला गती
पहिल्या टप्प्याच्या कामाचे आदेश जारी
सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. १४ : हरित वाढवण बंदर प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत योजनेच्या पहिल्या टप्प्याचे कामाचे आदेश ठेकेदारास देण्यात आले आहेत. या टप्प्यातील कामासाठी १३४.४२ कोटींच्या निविदा काढल्या होत्या, परंतु पीपी गोगाड जेव्ही या कंपनीने ८.१० टक्के कमी दराने बोली लावल्यानंतर हे काम १२३.५३ कोटी रुपयांत मंजूर केले.
वाढवण बंदर वसाहतीकरिता वाढवण नळ पाणीपुरवठा योजनेला मान्यता देण्यात आली होती. ही योजना १५.२३ एमएलडी इतक्या क्षमतेची आहे. विक्रमगड तालुक्यातील कुर्झे धरण येथून पाण्याची उचल केली जाणार आहे. या संपूर्ण योजनेसाठी ३२८ कोटींच्या जवळपासची प्रशासकीय मान्यता दिली गेली होती; मात्र प्रत्यक्षात २८१.९४ कोटींची अंतिम सुधारित तांत्रिक मान्यता या योजनेसाठी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात १३४.४२ कोटींचे काम केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित निधीची इतर कामे केली जाणार आहेत. सध्या काम जाहीर झालेल्या ठेकेदाराकडून केल्या जाणाऱ्या कामाचे सर्वेक्षण, नकाशा आराखडा व इतर अभियांत्रिकी कामे सुरू आहेत.
डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर उभारणीसाठी पाण्याची प्राथमिक आवश्यकता लक्षात घेत डहाणू तालुक्यातील सूर्या नदीतून गारगाव भागातून पाणी योजना प्रस्तावित होती; मात्र या योजनेला पाण्याचे आरक्षण न मिळाल्याने सुधारित योजनेनुसार कुर्झे धरणातून पाणी उचल करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार या धरणातून वाढवण बंदर प्रकल्प पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी आरक्षित करण्याला मान्यताही मिळाली आहे. सूर्या नदीवरून योजना प्रस्तावित होती. तेव्हा योजनेचा खर्च २२६ कोटींच्या जवळपास होता; मात्र आता पाणी कुर्जे धरणातून आणण्यात येणार असल्याने योजनेची किंमत अंदाजे ३२८ कोटी झाली. सुधारित योजनेचा आराखडा महाराष्ट्र जीवन प्रधिकरणामार्फत तयार केला असून, त्याला तांत्रिक मान्यता आहे.
सुधारित पाणीपुरवठा योजनेनुसार कुर्झे धरणातून १५.२३ दशलक्ष घनमीटर इतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. बंदरासाठी ६.१८ दलघमी तर बंदराच्या वसाहतीसाठी ९.५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या आरक्षणाला जलसंधारण/जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे. योजनेच्या कामासाठी ६५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता विभागीय प्राधिकरण कार्यालयाकडे वर्ग केला आहे.
योजनेत काय आहे?
वाढवण बंदर प्रकल्प पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कुर्झे धरण परिसरात जॅकवेल व पाणीभरण विहीर, ४८.७ किमीची जलवाहिनी, मुख्य जोडवाहिनी व काही ठिकाणी लागणारे जोडपूल, गारगाव भागातील २३ दलघमी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, ब्रेक प्रेशर टॅंक, गुरुत्वाकर्षण आधारित योजनेतील काही यंत्रणा, पाणी उचल पंप, मोठी-लघु-मध्यम प्रकाराच्या पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन, जलवाहिनीसाठी छोटे बोगदे व जोडरस्ते असे भाग पाणीपुरवठा योजनेचे असणार आहेत. यासह १३ लाख लिटरचे मुख्य संतुलन टाकी बंदरासाठी २० लाख लिटर तर वसाहतीसाठी ३० लाख लिटर क्षमतेच्या पाणी भरण टाक्क्यांचा समावेश आहे.
अशी नेणार वाहिनी
कुर्झे धरण येथून पुरवठ्याच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत असणार आहे. रबर बोर्डाजवळ सहा लाख ४० हजार लिटर क्षमतेची पाणी साठवण टाकी असणार आहे. तिथून गुरुत्वाकर्षणाने हे पाणी मुंबई वडोदरा एक्स्प्रेसवे आणि बोईसर ऐना येथून नेण्यात येणार आहे. पुढे वाढवण बंदराला जोडणाऱ्या प्रस्तावित महामार्गाकडून ही जलवाहिनी पुढे नेण्याचा विचार आहे. दरम्यान, गारगाव परिसरामध्ये २३ दलघमी जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित आहे. तेथून वाढवण बंदर व वाढवण बंदर वसाहत या दोन्ही ठिकाणी पाणीपुरवठा केला जाणार आहे.
योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
पाणीस्रोत : कुर्झे धरण
आरक्षित पाणी : एकूण १५.२३ दलघमी
बंदरासाठी : ६.१८ दलघमी
वसाहतीसाठी : ९.५ दलघमी
प्रकल्पाचा एकूण खर्च : ३२८ कोटी रुपये (तांत्रिक मान्यता प्राप्त)
पहिल्या टप्प्याचे काम : १२३.५३ कोटी
निधी मंजूर : ६५ कोटींचा पहिला हप्ता वितरित
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.