कुत्र्यांनी पनवेलकरांचे तोडले लचके !

कुत्र्यांनी पनवेलकरांचे तोडले लचके !

Published on

कुत्र्यांनी पनवेलकरांचे तोडले लचके!
सात महिन्यांत चार हजार ६५१ जणांना चावे
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. १६ (बातमीदार) : भटक्या कुत्र्यांनी गेल्या आठ महिन्यांत साडेचार हजारांपेक्षा अधिक नागरिक, लहान मुले, महिला, तसेच वृद्धांचे लचके तोडले आहेत. पनवेल पालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचीही दहशत वाढत चालली आहे. दिल्लीतील भटकी कुत्री पकडून ती तत्काळ कोंडवाड्यात ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेलच्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी करणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
जानेवारीपासून महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर १२ लाख ५२ हजार ३५० रुपये खर्च केला आहे. आजतागायत पनवेल पालिका क्षेत्रात १९ हजार ३०७ एवढी कुत्र्यांची संख्या असून, १२ हजार ४८६ कुत्र्यांचे निर्बीजीकरण झाले असल्याची माहिती इन डिफेन्स ऑफ ॲनिमल या संस्थेने दिली आहे. पालिका क्षेत्रामध्ये जानेवारीपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत चार हजार ६५१ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. चावा घेतलेल्या नागरिकांचे रेबीजचे लसीकरण करून चार हजार २५० लसी पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहेत, अशी माहिती पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली.

असे आहेत न्यायालयाचे आदेश
कोंडवाड्यात कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करा, कुत्रा कोंडवाड्याबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या, कोंडवाड्यांची संख्या वाढवा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, पकडलेल्या व कोंडवाड्यात ठेवलेल्या कुत्र्यांची नोंद ठेवा.

पालिका क्षेत्रातील कुत्र्यांची संख्या
१९,३०७
भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर खर्च - १२,५२,३५०
निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांची संख्या - १२,४८६
जानेवारीपासून चावा घेतलेल्या नागरिकांची संख्या - ४,६५१
प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लसींची संख्या -४,२५०

कुत्र्यांसाठी कोंडवाडा उभारा
पनवेल महापालिकेचे तक्का या ठिकाणी श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. पनवेल पालिकेने इन डिफेन्स ऑफ ॲनिमल या संस्थेला भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम दिले आहे. या संस्थेने १२ हजार ४८६ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा केला आहे; तरीही शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे निर्बीजीकरण करूनही मूळ प्रश्न सुटणारा नाही. त्यासाठी निर्बीजीकरणाऐवजी शहराच्या बाहेर भटक्या कुत्र्यांसाठी कोंडवाडा उभारण्याची आवश्यकता आहे.

पनवेल पालिका क्षेत्र रेबीजमुक्त करण्याच्या उद्देशाने भटक्या व पाळीव कुत्र्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण करण्याचा कार्यक्रम निरंतर सुरू आहे. पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधून रेबीजच्या लसी उपलब्ध आहेत.
- डॉ. आनंद गोसावी,
मुख्य आरोग्य अधिकारी, पनवेल महापालिका

Marathi News Esakal
www.esakal.com