तोतयागिरीपासून नागरिकांचे होणार संरक्षण

तोतयागिरीपासून नागरिकांचे होणार संरक्षण

Published on

तोतयागिरीपासून नागरिकांचे होणार संरक्षण
डिजिलॉकरचा वापर करून ओळखपत्र; रायगड पोलिस दलाचा अभिनव उपक्रम
अलिबाग, ता. १६ (वार्ताहर) : रायगड जिल्हा पोलिस दलाने नागरिकांना तोतया पोलिसांपासून संरक्षण देण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. देशभरातील पोलिसांमध्ये प्रथमच डिजिलॉकरच्या माध्यमातून प्रमाणित ओळखपत्र उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ अलिबाग येथे झाला. या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांत तोतया पोलिस बनून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकदा खोटे ओळखपत्र दाखवून नागरिकांना धमकावले जाते किंवा फसवले जाते. पोलिस ठाण्याच्या नावाने अजूनही भीतीचे वातावरण असल्यामुळे सामान्य लोक असे बनावट ओळखपत्र खरे समजून फसवणूक सहन करतात. यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास ढळण्याची शक्यता निर्माण होते. यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यासाठी रायगड पोलिसांनी डिजिलॉकर प्रणालीवर सर्व पोलिसांचे ओळखपत्र प्रमाणीकरण केले आहे.
या उपक्रमामुळे कोणतेही पोलिस ओळखपत्र दाखवल्यास त्याची पडताळणी नागरिकांना डिजिलॉकर अ‍ॅपद्वारे करता येणार आहे. त्यामुळे ते ओळखपत्र खरे आहे की खोटे, याचा त्वरित निर्णय घेता येईल. परिणामी, तोतया पोलिसांच्या भूलथापांना नागरिक बळी पडणार नाहीत. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेशी सुसंगत असून, कागदविरहित व सुरक्षित प्रशासनाची दिशा दाखवणारा आहे. या उपक्रमामुळे रायगड जिल्हा पोलिस दलाने संपूर्ण देशासाठी एक आदर्श निर्माण केला असून, लवकरच इतर जिल्ह्यांमध्येही हा उपक्रम राबवला जाण्याची अपेक्षा आहे.
.......
कोट :
डिजिलॉकर प्रणालीवर रायगड जिल्ह्यातील सर्व पोलिसांचे ओळखपत्रांचे प्रमाणिकीकरण करण्यात आले आहे. ज्यामुळे पोलिसांमार्फत दाखविण्यात आलेले ओळखपत्र खरोखर वास्तविक (खरे) आहे का, याची छाननी डिजिलॉकरद्वारे केली जाऊ शकते. परिणामी, बनावट, तोतया पोलिसांच्या भूलथापांना नागरिक बळी पडणार नाहीत.
- आंचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com