औषधोपचार थेट गावाच्या दारी
औषधोपचार थेट गावाच्या दारी
मोबाईल मेडिकल युनिटसाठी टॅबचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ ः दुर्गम भागातील नागरिकांना थेट त्यांच्या दारी आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या मोबाईल मेडिकल युनिट्स आता अधिक अद्ययावत आणि डिजिटल होणार आहेत. जिल्ह्यातील या युनिटसाठी खास टॅबलेट्सचे वितरण जिल्हा परिषद ठाणेच्या वतीने करण्यात आले. मोबाईल मेडिकल युनिट हे केवळ वाहन नाही, तर ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील २६० गावांसाठी चालतेबोलते आरोग्य केंद्र आहे. डॉक्टर, तपासणी सुविधा आणि औषधोपचार थेट गावाच्या दारी पोहोचवणे, हीच या उपक्रमाची खरी ताकद असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी म्हटले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते या सर्व मोबाईल मेडिकल युनिट पथकांना टॅबलेट्सचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या समिती सभागृह, जिल्हा परिषद ठाणे येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी बोलताना घुगे यांनी हे मत व्यक्त केले. तसेच नव्या टॅबलेटच्या माध्यमातून डेटा संकलन आणि रिपोर्टिंग अधिक अचूक होणार आहे. यामुळे आरोग्य सेवा अधिक वेगवान व परिणामकारक बनेल. मोबाईल मेडिकल युनिटच्या कार्यात आणखी सुलभता व दर्जा वाढविण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहील.
महाराष्ट्र राज्यात या उपक्रमाला मिळालेला प्रथम क्रमांक हा आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचा सन्मान असल्याचेदेखील घुगे यांनी सांगितले. या टॅबलेट्समध्ये विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध करण्यात येणार असून यामुळे रोजच्या आरोग्य सेवा अहवालाची नोंद ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. यामुळे मोबाईल मेडिकल युनिटचे कार्य अधिक मॉडर्न, अद्ययावत व कार्यक्षम होणार आहे. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आणि प्रधानमंत्री पीव्हीटीजी विकास मिशनअंतर्गत ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १० मोबाईल मेडिकल युनिट्स ग्रामीण व आदिवासी भागातील कातकरी समाज तसेच दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवत आहेत.
दरम्यान, या युनिट्समध्ये चार जणांची वैद्यकीय टीम असते. वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि सहाय्यक यामार्फत दुर्गम भागातील नागरिकांना मोफत तपासणी, औषधोपचार आणि आरोग्यविषयक सल्ला दिला जातो. जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे, की मोबाईल मेडिकल युनिट आपल्या गावात येत असल्यास त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी.
ठाणे जिल्ह्यातील मोबाईल मेडिकल युनिट कार्यरत :
तालुका युनिट
• शहापूर ३
• मुरबाड शहर व ग्रामीण ३
• भिवंडी २
• कल्याण १
• अंबरनाथ १
राज्यस्तरीय माहिती
राज्यात १०३ मोबाईल मेडिकल युनिट्स मंजूर असून, त्यापैकी ८७ पीव्हीटीजी जिल्ह्यांसाठी आणि १६ इतर जिल्ह्यांसाठी आहेत. सद्यस्थितीत राज्यभरातील ७९ युनिट्स कार्यरत आहेत. या योजनेचा उद्देश म्हणजे ज्या ठिकाणी आरोग्य सुविधा पोहोचणे कठीण आहे, अशा भागातील नागरिकांना त्यांच्या दारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.
प्रत्येक युनिटमध्ये चार जणांची टीम
वैद्यकीय अधिकारी
लॅब टेक्निशियन
फार्मासिस्ट
सहाय्यक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.