वावंढळ पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरुस्‍ती

वावंढळ पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरुस्‍ती

Published on

वावंढळ पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरुस्‍ती
प्रशासनाने वाढवली उंची; प्रवास होणार अधिक सुरक्षित
खालापूर, ता. १६ (बातमीदार) ः मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खालापूर हद्दीतील वावंढळवाडी गावानजीक असलेल्या पुलावर गेल्या अनेक वर्षांपासून अपुऱ्या उंचीच्या कठड्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता. अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) याकडे लक्ष देत पुलावर नवीन संरक्षक कठडा उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पनवेलहून खोपोलीच्या दिशेने जाताना चौक ते वावंढळवाडीदरम्यान नदीवर उभारलेला सुमारे २० फूट उंचीचा आहे. परंतु या पुलाच्या एका बाजूला केवळ अर्धा फूट उंचीचा कठडा शिल्लक असल्याने हा पूल अतिशय धोकादायक ठरत होता. रस्त्याला असलेले वळण आणि उतार यामुळे वाहनांचा तोल जाऊन अपघात घडण्याची शक्यता होती. काही वर्षांपूर्वी याच पुलावरून एसटी बस नदीत कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या अपघातात अनेक प्रवाशांनी आपला जीव गमावला होता. त्यामुळे पुलाच्या कठड्याची उंची वाढविण्याची मागणी वारंवार होत होती.
सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आयआरबी आणि संबंधित विभागाकडे कठड्याची उंची वाढविण्याबाबत अनेक वेळा निवेदन दिले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, सध्या पुलावर नवीन उंच कठड्याचे बांधकाम सुरू झाले आहे. मजबूत व उंच संरक्षक भिंत उभारली जात असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, आता प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुलावरून रोज हजारो वाहने जात असल्याने या कामामुळे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com