पनवेलमध्ये लोण्यावर लाखोंची लूट

पनवेलमध्ये लोण्यावर लाखोंची लूट

Published on

पनवेलमध्ये लोण्यावर लाखोंची लूट
कामोठे, कळंबोली, उलवे येथे दहीहंडी उत्‍साहात; सेलिब्रिटींची उपस्थिती ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
पनवेल, ता. १६ (बातमीदार) ः मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या पनवेल परिसरात यंदाचा दहीहंडी उत्सव भव्यतेने साजरा झाला. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष व संस्थांनी लाखोंची बक्षिसे जाहीर करून लोण्यावर लाखोंची लूट केली. कामोठे, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, खांदा वसाहत अशा विविध भागांत दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे, मुंबई व नवी मुंबई येथून आलेल्या शेकडो गोविंदा पथकांनी थरावर थर चढवत उत्सवाला रंगत आणली.
महाराष्ट्रातच दहीहंडीचा उत्साह सर्वाधिक पाहायला मिळतो. पुणे, मुंबई यासह राज्यभरात इतर ठिकाणीही हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात सहभागी होणाऱ्या तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. तरुणांची अनेक मंडळे एकापाठोपाठ एक असा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. या वेळी ‘गोविंदा आला रेऽऽ आला’च्या घोषणांनी पनवेल विशेष करून सिडको वसाहतीचा परिसर दुमदुमून गेला. पनवेल परिसरातही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. दहीहंडी महोत्सवाला यंदा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगले ग्लॅमर दिसून आले. या भागात २० पेक्षा जास्त गोविंदा पथके आहेत. त्याचबरोबर दहीहंडी उत्सव मंडळाची संख्याही मोठी होती. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, खारघर या ठिकाणी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबईतील शेकडो गोविंदा पथकांनी या हंड्यांना सलामी दिली. पनवेलमध्ये अतिशय शांततेत दहीहंडी उत्‍सव पार पडला. कामोठे वसाहतीमध्ये दहीहंड्यांची संख्या सर्वाधिक होती. कामोठेतील ऐश्वर्या हॉटेलजवळील मैदानात नीलेश लंके प्रतिष्ठानने तब्बल १५ लाख ३३ हजार ३३३ रुपयांची दहीहंडी लावली होती. या कार्यक्रमाला खासदार नीलेश लंके उपस्थित राहिले. त्याचबरोबर पारनेर रहिवासी संघाच्या वतीने साडेपाच लाखांची दहीहंडी, तर माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या शेकापतर्फे दोन लाखांहून अधिक बक्षिसांची दहीहंडी फोडली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व शिंदे गट) या सर्वांनी स्वतंत्र दहीहंडी उत्सवांचे आयोजन करून आपल्या कार्यकर्त्यांची ताकद दाखवली.
...............
उलव्यातही लाखोंची दहीहंडी!
उलवे सेक्टर १८ भूखंड क्रमांक ११४ येथे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. पाच लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे एकूण पारितोषिक दिले.
............
मराठी सिनेसेलिब्रिटींची हजेरी
विक्रांत पाटील फाउंडेशनने सात लाख ७७ हजार ७७७ रुपयांचे एकत्रित बक्षीस ठेवले आहे. त्यांनी यंदा अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांना निमंत्रित केले होते.
नवीन पनवेल येथील तेजस कांडपिळे यांच्या मंडळाद्वारे साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवात यावर्षी आघाडीचा मराठी सिनेअभिनेता श्रेयस तळपदे याने हजेरी लावत उत्सवात रंग भरला आहे. या मंडळांनी यावर्षी सात लाख ७७ हजार ७७७ असे एकत्रित बक्षीस ठेवले होते. महिलांकरिता ५५ हजार ५५५ रुपयांचे विशेष बक्षीस ठेवण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अमर ठाकूर यांच्या स्वर्गीय त्रिंबक जोमा ठाकूर सामाजिक संस्था रोडपाली-कळंबोली मंडळाने सिनेतारका अमृता खानविलकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. अमृताच्या नृत्याचा जलवा कळंबोलीकरांनी अनुभवला.

Marathi News Esakal
www.esakal.com