उल्हासनगर देशभक्तीच्या रंगात रंगले
उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करत उल्हासनगर महापालिकेने ७९वा स्वातंत्र्य दिन ऊर्जा, देशभक्तीची भावना आणि नागरी सहभागाच्या संगमात साजरा केला. प्रशासक तथा आयुक्त मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे प्रतीक असलेल्या विशाल तिरंगा कॅनव्हॉसद्वारे नागरिकांना देशप्रेमाचा अनोखा अनुभव मिळाला.
ध्वजारोहणानंतर महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. आमदार कुमार आयलानी यांनीही सोहळ्यास उपस्थित राहून नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यसैनिक हरिश्चंद्र जनार्दन जोशी यांचे नातू रमेश जोशी आणि स्वातंत्र्यसैनिक नेवादराम नागदेव यांची कन्या भागी नागदेव यांचा महापालिकेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी तिरंगा प्रतिज्ञा घेत अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांनी देशसेवेसाठी आपली निष्ठा व्यक्त केली.
महापालिका प्रांगणातील तिरंगा कॅनव्हॉसवर ‘हर घर तिरंगा’ लिहून नागरिकांनी देशभक्तीची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण, डॉ. किशोर गवस, उपआयुक्त डॉ. दिपाली चौगुले, स्नेहा करपे, विशाखा मोटघरे, सहाय्यक आयुक्त अजय साबळे, गणेश शिंपी, माजी नगरसेवक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक जल्लोष
महापालिका मुख्यालयातून गोलमैदान येथील ११० फूट उंच राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला. त्यांनी देशभक्तीपर गीतांवर लेझीम नृत्य सादर करून सर्वांचे मन जिंकले. यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.