जिल्ह्यात दहीकालामध्ये लाखोंची लयलूट
जिल्ह्यात दहीकालामध्ये लाखोंची लयलूट
पावसाच्या सरी झेलत रचले थरावर थर
अलिबाग, ता. १७ (वार्ताहर) ः ढाक्कुमाक्कुम...ढाक्कुमाक्कुम...ढाक्कुमाक्कुम... गोविंदा रे गोपाळा...या गाण्यावर ठेका धरत शनिवारी (ता. १६) जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात दहीहंडी हा पारंपरिक उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी सकाळपासूनच पावसानेही जोरदार हजेरी लावल्याने गोविंदांचा उत्साह द्विगुणित झाला होता. दहीहंडीवर राजकीय छाप पाहायला मिळाली. गोविदांना आकृष्ट करण्यासाठी रकमांच्या बक्षिसांचा साज चढविण्यात आला होता.
रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली. ग्रामीण भागात तो सायंकाळपर्यंत साजरा करण्यात आला. काही मोठ्या रकमेच्या हंड्यांचा ‘दहीहंडी सोहळा’ संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अलिबागमध्ये शेकाप आणि प्रशांत नाईक पुरस्कृत दहीहंडी, भाजप आणि प्रवीण ठाकूर व पिंट्या ठाकूर मित्रमंडळाच्या दहीहंडी स्पर्धा आकर्षणाचा विषय ठरल्या, तर पेझारीत सुमना आणि सवाई पाटील आयोजित ‘राजधानी रायगड’ ही सर्वाधिक रकमेची लयलूट करणारी दहीहंडी ठरली. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ४० लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल बक्षिसांवर झाल्याचा अंदाज आहे. विविध ठिकाणी ५३ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. अलिबागमधील चेंढरे येथील श्री कानिफनाथ मठात एकत्रित लावलेल्या दहीहंडी सोरट मारून फोडण्यात आल्या. कुर्डुस येथील सर्वांचे लक्ष वेधून घेणारी विहिरीतील दहीहंडी कुर्डुस गावातील आकाश पिंगळे याने फोडली.
...................
चौकट :
जिल्ह्यात आठ हजार ९०० हंड्या फोडल्या
जिल्ह्यात यावर्षी एक हजार ९१७ सार्वजनिक, तर तब्बल ७०६२ खासगी दहीहंड्या फोडण्यात आल्या. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १५० पोलिस अधिकारी, ९५० अंमलदार, ३५० होमगार्ड, एसपीआरएफची एक कंपनी व ७३ वाहतूक अंमलदार तैनात करण्यात आले होते.
..............
चौकट :
दहीहंडी उत्सवात झळकले नाशमुक्तीचे फलक
व्यसन म्हणजे जिवंतपणातील मरण, व्यसन सोडा फुलेल जीवन.... अशा आशयाचे फलक तयार करून त्याद्वारे नाशमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाने केला.
............
चौकट :
मच्छीमारीच्या अनुभवातून जन्मलेली परंपरा :
समुद्राशी सातत्याने झुंज देणाऱ्या अलिबागच्या कोळी समाजाने आपल्या कल्पकतेतून एक आगळीवेगळी परंपरा निर्माण केली आहे. सुमारे ६० वर्षांपूर्वी सुरू झालेली ग्रीस लावलेल्या मल्लखांबावरची दहीहंडी ही राज्यातील एकमेव आणि अनोखी दहीहंडी मानली जाते. कोळीबांधवांना समुद्रात मच्छीमारी करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या अडचणींवर तत्काळ उपाय शोधण्याची सवय त्यांच्यात उपजतच आहे. पूर्वी मच्छीमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या शिडाच्या लाकडी खांबावर ग्रीस लावून दोरखंड फिरवले जात. याच दैनंदिन अनुभवातून ग्रीस लावलेल्या मल्लखांबावर दहीहंडी फोडण्याची कल्पना कोळी समाजात रुजली. गोपाळकाल्याच्या दिवशी, अलिबाग कोळीवाड्यातील मच्छीमार सोसायटीच्या शेजारील पटांगणात हा मल्लखांब उभारला जातो. संपूर्ण मल्लखांब ग्रीसने माखला जातो आणि त्याच्या टोकाला दोरांच्या सहाय्याने दहीहंडी बांधली जाते. गोविंदांना क्रमांक देऊन, प्रत्येकजण ग्रीसने माखलेल्या मल्लखांबावरून वर चढण्याचा प्रयत्न करतो. ग्रीस लावल्यामुळे अनेकदा गोविंदा घसरून खाली येतो, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर कोणीतरी हंडी फोडतो. दरवर्षी ७० ते ८० गोविंदा या स्पर्धेत भाग घेतात. पाच फेऱ्यांनंतर मल्लखांबावरील ग्रीस कमी होत जाते आणि शेवटी एखादा गोविंदा यशस्वी होतो. विजेत्या गोविंदाला कोळी समाज मंडळाकडून मोठ्या रकमेचे पारितोषिक दिले जाते. दुपारी ३ वाजता सुरू होणारी ही स्पर्धा रात्री १२ वाजेपर्यंत रंगते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.