तिसऱ्या ‘बहिणी’चा लाभ होणार बंद

तिसऱ्या ‘बहिणी’चा लाभ होणार बंद

Published on

तिसऱ्या ‘बहिणी’चा लाभ होणार बंद
रायगडमध्ये ६३ हजार ६४ महिलांची होणार फेरपडताळणी; पनवेल तालुक्यात तब्बल १२ हजार २१९ बहिणींचा समावेश
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा.
पनवेल ता. १७ (बातमीदार) ः एकाच घरात लाभ घेत असलेल्या तिसऱ्या बहिणींसह ६५ वर्षे झालेल्या, तसेच २१ वर्ष पूर्ण नसलेल्या ‘लाडक्या बहिणीं’ची फेरपडताळणी सरकारने हाती घेतली आहे. यासाठी जिल्ह्यात प्रशासनाकडे ६३ हजार ०६४ बहिणींची यादी प्राप्त झाली. या लाभार्थींची अंगणवाडी सेविकांमार्फत तपासणी सुरू झाली आहे. त्यामुळे योजनेच्या निकषात न मोडणाऱ्या बहिणींचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. दरमहा मोठी रक्कम त्यावर खर्च होत असल्याने शासनाला आर्थिक नियोजनाची कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला चारचाकी वाहनधारक त्यानंतर संजय गांधी निराधार, पंतप्रधान सन्मान योजना तसेच शासनाच्या अन्य योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थींची पडताळणी झाली होती. आता वय व एकाच कुटुंबातील तिसऱ्या लाभार्थीची पडताळणी सुरू झाली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राप्त माहितीतून या निकषात मोडत असलेल्या लाभार्थीची यादी करून ती पडताळणीसाठी तालुका स्तरावर दिली आहे. रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणी योजना तपासणीदरम्यान मोठा आकडा समोर आला आहे. एकूण ६३ हजार ०६४ बहिणी अपात्र ठरणार असून, यामध्ये २१ वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला तसेच एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थिनींचा समावेश आहे. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक अपात्र बहिणींची संख्या पनवेल तालुक्यात असून, तब्बल १२ हजार २१९ बहिणी अपात्र होणार आहेत. त्यानंतर अलिबाग, माणगाव, खालापूर, पेण, महाड आदी तालुक्यांचा क्रमांक लागतो.
राज्य सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचे अनेक निकष लावण्यात आले होते, मात्र निवडणुकीचे वातावरण असल्याने मतांच्या हव्यासापोटी महायुतीने महिला अर्जाची अधिकची चाचपणी न करता आलेल्या बहुतांश अर्ज पात्र ठरवीत निकषात बसविले. त्यामुळे पात्र अर्जदारांच्या खात्यात दीड हजार रुपये पाठविणे क्रमप्राप्त ठरले होते. कालांतराने पात्र नसतानाही लाभ घेत असल्याची चर्चा गावच्या पारापासून विधानसभेपर्यंत ऐकू येऊ लागली. त्यातच सरकारचा सगळा पैसा लाडकी बहीण योजनेत जात असल्याने सरकारने छाननी करून अर्ज अपात्र करण्यास सुरुवात केली.

अपात्रतेचा निर्णय कुटुबीयांवर
योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला घेत असल्यास, कुटुंबातील सदस्यांना विचारून कोणाला अपात्र करायचे, हे ठरविले जाणार आहे. योजना सुरू झाल्यानंतर शिधापत्रिकेमध्ये बदल केलेला असल्यास जुन्याच शिधापत्रिकेप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य धरण्याची सूचना दिली आहे.

अशी होणार तपासणी
१) महिला व बालविकास मंत्रालयातील सचिवांच्या सूचनांनुसार, नारी शक्ती दूत ॲपवर १ जुलै २०२४ तर वेब पोर्टलवर ३० सप्टेंबर २०२४ रोजी २२ वर्षे पूर्ण करत नसलेल्या लाडक्या बहिणी अपात्र ठरविण्यात येणार आहेत.
२) ज्या लाभार्थींचे वय १ ऑगस्ट २०२५ रोजी ६५ पेक्षा जास्त असेल, त्यासुद्धा अपात्र ठरणार आहेत. वयाची तपासणी करताना आधार कार्ड व्यतिरिक्त जी कागदपत्रे अपलोड केली आहेत, ती तपासूनच खात्री केली जाणार आहे.
३) आधार कार्ड व अन्य कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल असलेली लाभार्थी अपात्र होणार आहे. कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभार्थी असल्यास त्यांची शिधापत्रिका तपासून किती महिला लाभ घेत आहेत, याची तपासणी होणार आहे. ४)लाभार्थी अन्यत्र स्थलांतरित झाल्यास तेथील प्रकल्प अधिकाऱ्यामार्फत तपासणी होईल. या ठिकाणी लाभार्थीबाबत कोणतीही माहिती अवगत न झाल्यास अपात्र ठरविण्याची सूचना देण्यात आली आहे.


११३ कोटी ५१ लाख ५२ हजारांचा लाभ
लाडकी बहीण योजना जून २०२४ मध्ये सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होत होते. सद्य:स्थितीत या योजनेला वर्ष झाले आहे. जिल्ह्यात ६२ हजार ०६३ महिलांनी निकषात बसत नसतानाही लाभ घेतला असल्याने अपात्र असूनही या महिलांनी दीड हजाराप्रमाणे वर्षांची आकडेवारी काढल्यास ११३ कोटी ५१ लाख ५२ हजारांचा फुकटचा लाभ घेतल्याची आकडेवारी समोर येत आहे.

अर्ज अपात्र होण्याची कारणे
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला, अन्य शासकीय योजनेचा लाभ, नमो शेतकरी योजनेचा लाभ, कुटुंबामध्ये चारचाकी वाहने, अर्जदार २१ ते १ ते ६५ वयोगटात बसत नाहीत, सद्यःस्थितीत अर्जदाराचे वय ६५ वर्ष पूर्ण, एका कुटुंबामध्ये जास्त महिला लाभ घेतात.


तालुकानिहाय अपात्र बहिणी

तालुका -----वय २१ च्या आतील व ६५ वरील----कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिला
१. अलिबाग-६९० / ५७९५
२. २ कर्जत- ५५२ /२८२६
३. माथेरान -३३५/ ३००५
४. माथेरान शहर -२ /२२
५. खालापूर -५३५ /४४३३
६. महाड -५८१/ ३२२२
७. माणगाव- ५५८/ ४४४८
८. म्हसळा -८५ /१२०२
९. म्हसळा शहर- ९७ /९५६
१०. मुरूड -१८५ /२२८३
११. पनवेल -१४२८ /१०७९१
१२. पेण -५०९ /४५३५
१३ पोलादपूर- १९६ /८४०
१४ रोहा -५८४ /३८१३
१५ श्रीवर्धन- २७० /२२९१
१६ सुधागड- ९२ /३६६
१७ सुधागड-पाली- ११६ /५६५
१८ तळा -२०५ /१५३६
१९ उरण -२७७/ २८३८
एकूण - ७२९७/५५,७६७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com