कल्याण शीळ रोड : जीवन मरणाचा खेळ
कल्याण-शिळ रस्त्यावर अपघातांची मालिका
पाचवी सहावी लेन रखडल्याने धोकादायक प्रवास
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : कल्याण येथील तरुणाच्या मृत्यूने कल्याण-शिळ रस्त्यावरील कोंडी आणि खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पाचवी व सहावी मार्गिका रखडल्याने या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे चालकांसाठी जीवन मरणाचा खेळ ठरत आहे.
मुंबई व उपनगरांना जोडणारा कल्याण-शिळ रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गातून मेट्रो जाणार असल्याने मोठमोठे गृहप्रकल्प येथे सुरू झाले आहेत. यामुळे या भागाचे शहरीकरण हे झपाट्याने वाढत आहे. कल्याण-शिळ रस्त्याची झालेली दुरवस्था आणि या मार्गावरील कोंडी फोडण्यासाठी या मार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण केले; मात्र पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम होऊ शकलेले नाही. शिळ मार्गाच्या रुंदीकरणासाठी भूमिपुत्रांकडून जमिनीची हस्तांतरण प्रक्रिया राबवली.
हस्तांतरणाचा मोबदला न मिळाल्याने भूमिपुत्रांनी जमिनी देण्यास नकार दिल्याने त्या-त्या भागातील रुंदीकरण तसेच काँक्रीटीकरण रखडले आहे. काही ठिकाणी हस्तांतरण झाले आहे, तेथे पेव्हर ब्लॉक प्रशासनाने लावले आहेत. जिथे झाले नाही तो भाग तसाच सोडून दिला आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर मेट्रोचे काम हाती घेण्यात आले. यासाठी नवीन सिमेंटचा रस्ता हा तोडण्यात आला. विधानसभा निवडणूक संपताच या कामाने आता वेग पकडला आहे. या कामामुळे वाहनधारकांना काँक्रीट रस्त्याची एक मार्गिका मिळते तर कुठे दोन मार्गिकेवरून प्रवास करावा लागतो. बाकी रस्ता हा कच्चा असून, त्यावरुनच प्रवास करावा लागत आहे.
पावसाचे दिवस असल्याने या मार्गावर आता वाहनांची कायमच वर्दळ राहते. चोवीस तास या मार्गावर कोंडी असते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. सकाळ-संध्याकाळ ही कोंडी जास्त प्रमाणात होत असल्याने सकाळी कामावर जाण्याची घाई असल्याने कच्च्च्या रस्त्यावरून प्रवास करतात. तसेच सायंकाळी वाहने जागची हलत नाहीत. परिणामी दुचाकीस्वार, रिक्षाचालक हे कच्च्या रस्त्यावरून प्रवास करताना दिसतात. या कच्च्या मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही.
खड्ड्यांमध्ये मोठमोठे दगडदेखील आहेत. या दगडांवर दुचाकी आदळल्याने किंवा रिक्षाचे एखादे चाक धडकल्यास वाहनांचा तोल जातो. तसेच काही ठिकाणी अत्यंत खोलगट भाग असल्याने त्यातून मार्ग काढू शकते, मात्र स्कूटी गाडी ही खड्ड्यात रुतण्याची शक्यता असते. अशावेळी हे वाहनचालक काँक्रीट रस्त्याचा आधार घेण्याचा प्रयत्न करतात; मात्र कच्चा रस्ता आणि काँक्रीट रस्त्यातील उंचीचे अंतर जास्त असल्याने वाहने वरती चढत नाहीत. त्यामुळेदेखील दुचाकीस्वारांचा तोल जातो.
रुणवाल माय सिटी परिसरात रस्त्याच्या बाजूला फुटपाथ बांधले आहेत. या फुटपाथची दुरवस्था झाली असून, कधी कोणती गाडी खाली खचेल याचा नेम नाही. गटारांची झाकणे या भागात तुटलेली आहे. मध्यंतरी काही रिक्षाचालकांनी येथे थांबा बनवला होता. तसेच या गृहसंकुलातील वाहनचालकांसाठी (विरुद्ध दिशेच्या वाहनांसाठी) रस्त्यावरील एक लेन आडोसा टाकून बंद करून टाकली होती; मात्र नागरिकांच्या विरोधानंतर तो अडथळा काढून टाकला आहे.
उद्घाटनात तत्परता, पण...
मार्गावरील मेट्रोच्या कामाने आता गती पकडलेली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेले हे काम आता झपाट्याने होत आहे. तसेच देसाई खाडी ते काटई नाका या नव्या पलावा उड्डाणपुलाचे कामदेखील घाईघाईने करत सत्ताधारी प्रशासनाने त्याचे उद्घाटन केले. मग हीच तत्परता या जागेच्या हस्तांतरणात आणि कामात का दाखवली जात नाही, असा सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत.
प्रशासन कधी जागे होणार
दररोज लाखो प्रवासी, हजारो वाहने या रस्त्यावरून जातात. या मार्गावर आत्तापर्यंत दोन ते तीन अपघात झालेले आहेत. त्यात रोहन शिंगरे या २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अपघातांत बळी पडल्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता तरी प्रशासनाने तातडीने कारवाई करून हा मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले, मात्र त्याची पूर्तता करण्यासाठी सरकारने पावले उचलली नाहीत. यामुळे अपघातात विनाकारण लोकांचा जीव जातो त्याला सरकार जबाबदार आहे. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ असो येथील बाधितांना मोबदला आधीच दिला जातो. मग येथील भूमिपुत्रांना का वेठीस धरले जात आहे. त्यांचे जे काही देणे लागते त्याची पूर्तता करून लोकांचा निष्कारण जीव जातो ते थांबवा, अशी कळकळीची विनंती सरकारला आहे.
- सुभाष भोईर, माजी आमदार, शिवसेना ठाकरे गट
लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला? शिळफाटा रोडवरील कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. हा संपूर्ण कारभार नियोजनशून्य आहे. रस्ता रुंदीकरण करण्याऐवजी पर्यायी मार्ग शोधणे अत्यंत गरजेचे होते, मात्र ते न करता सगळा भार याच रस्त्यावर टाकण्यात आला आणि त्यामुळे आजची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
- दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख शिवसेना ठाकरे गट
अपघातांच्या घटना
जुलै २०२५ : नवीन पलावा पूल सुरू झाला आणि दोन दुचाकीस्वारांचा खडीमुळे गाडी घसरून अपघात झाला.
जून २०२५ : पलावा पुलाचे काम सुरू असताना पुलावरील डांबर खालून जाणाऱ्या कारवर कोसळून अपघात, यात कारचे नुकसान झाले.
२०२३ : शिकवणीसाठी पायी चालत जाणाऱ्या विद्यार्थिनीला एका कारने धडक दिल्याने त्यात ती जखमी झाली.
डिसेंबर २०२१ : त आजदेगाव येथे राहणारे मनोज चव्हाण यांचा दुचाकीवरून तोल जाऊन पाठीमागून आलेल्या डम्परने उडविल्याने या अपघातात मृत्यू झाला.
डिसेंबर २०२१ : तीन वाहनांचे अपघातात नुकसान झाले होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे कार पलटी होऊन हा अपघात झाला होता. यात माजी नगरसेवकाचा मुलगा जखमी झाल्याची घटना घडली होती.
ऑक्टोबर २०२१ : रस्त्याच्या अर्धवट राहिलेल्या कामाच्या ठिकाणी लोखंडी पत्रा लावून ठेवला होता. हा पत्रा लक्षात न आल्याने एका कारचा भीषण अपघात होऊन यातील चालक जखमी झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.