कल्याण अवती-भवती
कृष्णाई गोविंदा पथकाने फोडली मानाची हंडी
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : बल्याणी प्रभागात दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना बल्याणी प्रभाग, साई प्रतिष्ठान, माजी नगरसेवक मयूर पाटील आणि माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्सवात कृष्णाई गोविंदा पथकाने सात थर लावत मानाची दहीहंडी फोडली. विजेत्या पथकाला रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमात तब्बल १०० हून अधिक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. पहिल्या क्रमांकासाठी ११ लाख ११ हजार १११ रोख बक्षीस जाहीर करण्यात आले होते. बल्याणी ग्रामीण परिसर असूनही पंचक्रोशीतील अनेक नामांकित पथकांनी येथे उपस्थित राहून दहीहंडीला सलामी दिली. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गायक परमेश माळी यांच्या सांस्कृतिक पथकाने कोळी गीते, लावण्या सादर करून उत्सवात रंग भरला. या वेळी मयूर पाटील यांनी सांगितले, की शासनाकडून गोविंदा पथकांसाठी विमा कवच देण्यात आले असून, हिंदू सण मोठ्या जल्लोषात साजरे होऊ लागले आहेत. यामुळेच दहीहंडी उत्सवाची भव्यता वाढली आहे.
.....................
टावरीपाडा परिसरात सायबर सुरक्षा जनजागृती अभियान
कल्याण (वार्ताहर) : ऑनलाइन फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर टावरीपाडा परिसरात ‘सायबर सुरक्षा जनजागृती अभियान’ राबविण्यात आले. हा उपक्रम स्फूर्ती फाउंडेशन व महाराष्ट्र उद्योजक परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी, ओटीपी फसवणूक, लिंकद्वारे पैसे चोरी, स्पॅम कॉल्स, सोशलमीडिया ब्लॅकमेलिंग अशा अनेक विषयांवर या वेळी उपस्थित नागरिकांना माहिती देण्यात आली. भारतात गेल्या काही वर्षांत ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अनेक वेळा ही फसवणूक केवळ आर्थिकच नसते, तर ती मानसिक त्रास व सामाजिक बदनामीस कारणीभूत ठरते, असे मत स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘सामान्य माणसापर्यंत सायबर सुरक्षिततेची माहिती पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे आणि हे अभियान अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
.......................
हजारो दिव्यांग बांधवांना व्हीलचेअरचे वाटप
कल्याण (बातमीदार) : प्रभाग क्र. १०३, कैलाशनगरचे माजी नगरसेवक मनोज राय यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो दिव्यांग नागरिकांना मोफत व्हीलचेअर वाटप करून समाजकारणाचा एक स्तुत्य उपक्रम राबविला. या उपक्रमात कल्याण, डोंबिवली आणि ठाणे परिसरातील अनेक दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर, वॉकर आणि आधार काठ्या वाटण्यात आल्या. साधारणतः ₹५,००० किमतीच्या या व्हीलचेअर्सचे वितरण विनामूल्य करण्यात आले. मनोज राय म्हणाले, ‘‘राजकारणापेक्षा समाजकारण अधिक महत्त्वाचे आहे. दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर म्हणजे एक आधार आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हेच खरे आशीर्वाद आहेत.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ज्यांना अशा सहाय्यक साधनांची गरज आहे, त्यांनी कुठलाही संकोच न ठेवता थेट संपर्क साधावा.’’ हा उपक्रम स्वावलंबनाचा मार्ग सुकर करतो, असे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.