रायगडमध्ये धुवाॅंधार!
रायगडला पावसाने झोडपले
कुंडलिका, अंबा नदी इशारा पातळीवर, जनजीवन विस्कळित
अलिबाग, ता. १८ (वार्ताहर)ः रायगड जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे अंबा, कुडंलिका नदीने सोमवारी (ता. १८) धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.
जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अलिबाग शहरातील कामगार नाका परिसरासह अलिबाग एसटी बसस्थानकात पाणी साचले आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले असून, जिल्ह्यातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे, तर २८ लघु पाटबंधाऱ्यांपैकी सर्व धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा असल्याने अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पेण तालुक्यातील कामार्ली येथील हेटवणे धरणाचे सहा उभे दरवाजे २० सेंटीमीटर उघडले असून, धरण पाणीपातळी ८५.१० मीटर आहे. भोगेश्वरी नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
-------------------------------------
म्हसळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
दरड तसेच पूरग्रस्त गावातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तालुका, ग्रामपातळीवरील प्रशासनाला लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या आहेत. सोमवारी सकाळच्या अहवालानुसार, म्हसळा तालुक्यात २१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर सर्वांत कमी पाऊस उरण तालुक्यात ५१ मिमी एवढी नोंदवला गेला आहे.
-----------------------------------
पावसाची नोंद
तालुका मिलिमीटर
अलिबाग : ८६
मुरूड : ८०
पेण : ८२
पनवेल : ११६.२
उरण : ५१
कर्जत : ५५
खालापूर : ६०
माथेरान : ९२
रोहा : १२०
सुधागड : ७८
माणगाव : ९१
तळा : ८८
महाड : ९२
पोलादपूर : १०७
श्रीवर्धन : १०२
म्हसळा : २१५
एकूण : १५१५.२