उत्सवासाठी ऑनलाइन परवानगी

उत्सवासाठी ऑनलाइन परवानगी

Published on

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : गणेशोत्सवासह पुढे येणाऱ्या सर्व सार्वजनिक उत्सवांना लागणाऱ्या परवानग्या आता महापालिकेकडून ऑनलाइन दिल्या जाणार आहेत. महापालिकेच्या १० सेवा नुकत्याच ऑनलाइन सुरू झाल्या आहेत. त्यात उत्सव परवानगीचादेखील समावेश आहे. या सेवांच्या ऑनलाइन परवानगीचे नुकतेच आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

महापालिकेने नागरिकांशी संबंधित ५२ सेवा ऑनलाइन यापूर्वीच उपलब्ध केल्या आहेत. त्यात आता आणखी १० सेवांची भर पडली आहे. त्यात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाशिवाय अन्य सार्वजनिक उत्सव व सणांसाठी महापालिकेकडून घ्याव्या लागणाऱ्या परवानगींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांना मंडप व अन्य परवानग्या आता ऑनलाइनही दिल्या जाणार आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावर उत्सव परवानगी एका क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी परवानगी घेणाऱ्याने आपली नोंदणी करायची आहे. त्यानंतर उपलब्ध होणारा अर्ज भरून तो अपलोड केला की उत्सवाची परवानगी दिली जाणार आहे. ही परवानगी घेताना अग्निशमन व पोलिसांचा ना हरकत अर्जासोबत जोडणे आवश्यक असणार आहे.

या नवीन सेवांचा समावेश
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिल्या जाणाऱ्या अन्य सेवांसाठीच्या परवानग्यादेखील आता ऑनलाइन घेता येणार आहेत. त्यात प्रामुख्याने शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या पूर्णत्वाचा दाखला, विकासकामांचा प्रमाणानुसार तपशील, भूमिगत ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी परवानगी, गटारे व पदपथ यावर खासगी संस्थांतर्फे टाकण्यात येणाऱ्या स्लॅबसाठी परवानगी, तसेच स्वखर्चाने गटारे, रस्ते बांधण्यासाठी परवानगी, सार्वजनिक भागातून जाणाऱ्या रस्त्यासाठी परवानगी, गटारांवर झाकणे टाकण्यासाठी, खड्डे दुरुस्तीसाठी व रस्ता खोदकाम करण्यासाठीच्या परवानग्यांचा यात समावेश आहे.

महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियानअंतर्गत नागरिकांशी संबंधित विविध प्रकारच्या सेवा येतात. या सर्व सेवा महापालिकेकडून दिल्या जातात. या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, तसेच त्यांना कार्यालयात यावे लागू नये, यासाठी या सेवा महापालिकेकडून ऑनलाइन केल्या जात आहेत. त्यात प्रामुख्याने पाणीपुरवठा विभागाकडून नवीन नळजोडणी, जलवाहिनी दुरुस्ती, मीटर नादुरुस्ती, जोडणी स्थलांतर, पाणीदेयक अशा १६ सेवा, मालमत्ता कर विभागात, नवीन कर आकारणी, मालमत्ता कर हस्तांतरण, खाते उतारा, कराचे देयक, नावात दुरुस्ती अशा १२ सेवा, त्याचप्रमाणे जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना, अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला, नगररचना विभागाकडील भाग नकाशा, झोन दाखला आदी सेवांचा समावेश आहे. त्यात आता नव्याने सुरू केलेल्या १० सेवांचा समावेश झाला आहे.

नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा लोकाभिमुख करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या सर्व सेवा नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com