मोकळे रस्ते श्र्वानांचे अड्डे
पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. १८ : शहरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. हे कुत्रे पादचाऱ्यांवर आणि रस्त्यावरून जाताना दुचाकीचालकांवर पाठलाग करून हल्ला करतात. अनेकदा दुचाकीचालक घाबरून अपघातांना सामोरे जातात. सात महिन्यांत शहरातील सात हजार लोकांवर कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. महापालिका प्रशासन यावर गप्प आहे. कुत्र्यांची काळजी घेणारे कंत्राटदार अधूनमधून रस्त्यांवर दिसतात. कुत्र्यांना योग्यरित्या न पकडल्याने आणि त्यांचे निर्बीजीकरण न केल्याने, भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या घटना मानवी सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना धोका निर्माण केला आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील दर्गा रोड परिसरात, एका भटक्या कुत्र्याने एकाच दिवसात ११ लोकांचा चावा घेतला. एका इमारतीत उभ्या असलेल्या व्यक्तीवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याचप्रमाणे कल्याण रोडवरून अशोकनगरमध्ये प्रवेश करताच चार ते पाच जणांच्या टोळीत उभे असलेले भटके कुत्रे अचानक जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करतात. अनेक वेळा कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भीतीने वाहनचालक रस्त्यावर पडतात आणि गंभीर जखमी होतात. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक लोकांना हे भटके कुत्रे चावतात.
भिवंडी उपजिल्हा रुग्णालयाची आकडेवारी
जानेवारी : १०६६
फेब्रुवारी : १०४२
मार्च : ११०४
एप्रिल : ९८८
मे : १०००
जून : ६८९
१५ जुलैपर्यंत : ३६१
१५ जुलै ते १५ ऑगस्ट : एक हजाराहून अधिक
३२७५ कुत्र्यांचे निर्बीजीकरण
गेल्या वर्षीही शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारीवरून तत्कालीन आयुक्त आणि प्रशासनाने ११ नोव्हेंबर २०२४ पासून १२ वर्षांपासून बंद असलेले श्वान निर्बिजीकरण केंद्र पुन्हा सुरू केले. हैदराबादच्या ‘व्हेट्स सोसायटी फॉर अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन’ यांच्यासोबत निर्बिजीकरण कामासाठी पाच वर्षांचा करार करण्यात आला आहे. या संस्थेला प्रत्येक कुत्र्याच्या नसबंदीसाठी १४५० रुपये दिले जात आहेत. या संदर्भात, महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे प्रमुख फैजल तातली यांनी सांगितले की, ११ नोव्हेंबर २०२४ ते १५ जुलै २०२५ दरम्यान शहरात एकूण ३२७५ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून रेबीज लसीकरण करण्यात आले. निर्बीजीकरण केंद्रात एक हजार कुत्र्यांना राहण्याची व्यवस्था आहे.
मानवसुरक्षेसाठी जोखमीची बाब
सद्यस्थितीत, भिवंडी शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. ते कळपाने शहरात फिरतात आणि रिकाम्या रस्त्यांना आपले अड्डे बनवतात. झोपडपट्ट्या व सार्वजनिक ठिकाणी मुले आणि नागरिक एकांतात दिसल्यावर कुत्रे त्यांचा पाठलाग करतात. अनेक वेळा लोक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताना खाली पडतात व हातपाय मोडतात. शहरातील नागरिक आणि प्रशासनासाठी ही परिस्थिती गंभीर चिंता आणि मानवसुरक्षेसाठी जोखमीची बाब बनली आहे.