थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

Published on

कोपरखैरणे-घणसोली एमआयडीसी वसाहतीत ड्रेनेजचा प्रश्न गंभीर
कोपरखैरणे, ता. १८ बातमीदार : कोपरखैरणे व घणसोली एमआयडीसी वसाहतीतील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज गटार समस्येमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. अनेक भागात गटारे तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. पावसाचे पाणी व सांडपाणी मिसळल्याने लहान मुले, महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे. डेंगी, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या रोगांचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा आरोप आहे की, वारंवार तक्रारी करूनही महापालिका केवळ पाहणीपुरतीच मर्यादित राहते. प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम मात्र होत नाही. दररोज घरासमोर सांडपाण्याचे डबके साचतात, मुलांना बाहेर खेळायलाही भीती वाटते, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. दरम्यान, पर्यावरण तज्ज्ञांनी देखील इशारा दिला आहे की, ड्रेनेज व्यवस्थेची योग्य साफसफाई न केल्यास वसाहतीला मोठ्या प्रमाणात आरोग्यधोका संभवतो. याप्रश्नी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, जर तत्काळ सुधारणा केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
................
नेरूळमध्ये पदपथांवर अस्वच्छता
नेरूळ बातमीदार : परिसरातील अनेक पदपथ अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहेत. झाडांची छाटणी करून टाकलेल्या फांद्यांचे ढीग आणि कचरा मागील काही आठवड्यांपासून पदपथांवरच पडून आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्यास भाग पडत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात या फांद्यांखाली पाणी साचून चिखल तयार होत आहे. परिणामी घसरून पडण्याच्या घटना घडू शकतात. नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर रोष व्‍यक्‍त केला आहे. झाडांची छाटणी वेळेवर होते, पण त्यानंतर फांद्या व कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पदपथ ऐवजी तेच कचऱ्याचे डेपो झाले आहेत, अशी नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली. या परिस्थितीमुळे डास व इतर कीटकांची पैदास वाढली असून, मलेरिया, डेंगी यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
महापालिकेने झाडे छाटल्यानंतर तत्काळ साफसफाई करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, अन्यथा नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे नेरूळमधील नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असून, संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.
....................
सानपाडा येथे सकल मराठा मुख्य समन्वयकांची बैठक
सानपाडा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण यंदा २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सकल मराठा समाजाचे मुख्य समन्वयक यांची महत्त्वपूर्ण बैठक सानपाडा येथे पार पडली. बैठकीत राज्यभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या मराठा बांधवांच्या निवास व भोजन व्यवस्थेवर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीत ६० समन्वयक उपस्थित होते. मनोज जरांगे २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून निघून २८ तारखेला नवी मुंबईत मुक्काम करणार आहेत. त्यानंतर ते आझाद मैदान गाठतील. नवी मुंबईत मुक्कामादरम्यान राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या राहण्याकरिता एपीएमसी मार्केट, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, भारती विद्यापीठ, सिडको प्रदर्शन केंद्र व आगरी कोळी भवन अशा पाच ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे विभागनिहाय बैठका सोमवारपासून सुरू होतील व अंतिम बैठक पुढील रविवारी होणार आहे. दिघा, एरोली, घणसोली, वाशी, तुर्भे, नेरूळ व बेलापूर या विभागातील समन्वयकांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या लढ्याला नवी मुंबईतून मोठा पाठिंबा मिळावा, यासाठी सर्व स्तरांवर तयारी सुरू असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.
.................
पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
वाशी बातमीदार : नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित पर्यावरणपूरक व प्लॅस्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२४ चा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आदर्श ठेवत दिलेल्या सहभागाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
सेक्टर १७ कोपरखैरणे येथील मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा निकेतन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकावर सेक्टर १० नेरूळ येथील नवयुग उत्सव मित्र मंडळ तर तिसऱ्या क्रमांकावर तुर्भे सेक्टर २० येथील शिवछाया मित्र मंडळाने बाजी मारली. तसेच लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती, नेरूळ व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वाशी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बसवणाऱ्या वाशीतील युवा गणेश उत्सव मंडळास विशेष पारितोषिक मिळाले, तर प्लॉस्टिकमुक्त सजावट करणाऱ्या घणसोलीतील शिवसाई माथाडी कामगार मित्र मंडळालाही गौरविण्यात आले. या प्रसंगी आयुक्त कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा उत्सव नाही, तर पर्यावरणपूरक संदेश देणारा महत्त्वाचा सण ठरावा, असे प्रतिपादन परीक्षक राजेश अहिरे यांनी केले. यंदा मागील वर्षीपेक्षा अधिक मंडळे प्लॅस्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
..............
खारघरमध्ये दहीहंडी उत्सव उत्साहात
खारघर : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्यानिमित्ताने खारघरमध्ये शिवसेना प्रणित नवनिर्माण सेवाभावी संस्थेतर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. सेक्टर २० मधील डेली बाजार चौकात पार पडलेल्या या उत्सवाला मोठी गर्दी उसळली. धारावी येथील एम. जी. नगर गोविंद पथकाने तब्बल सात थरांची मानवी रचना उभारून दहीहंडी फोडत यश मिळवले. विजेत्या पथकाला रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी आमदार बाळाराम पाटील, कॉलनी फोरम अध्यक्षा लीना गरड, माजी ग्रामपंचायत सदस्या प्रणिता परब यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या दहीहंडी स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख ५५ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. दिवसभरात नवी मुंबई, पनवेल, ठाणे व मुंबई परिसरातील सुमारे तीस पथकांनी सलामी दिली. सर्व पथकांना रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उत्सव यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख प्रसाद परब, उपशहरप्रमुख शैलेश शिंदे, प्रकाश वाघ, राजू कुंबळे, संतोष पंडित, युवा सेना पदाधिकारी ओमकार वेदांत, जयेश विसावे, आदर्श कांबळे तसेच महिला शहरप्रमुख चंचला बँकर यांनी विशेष मेहनत घेतली. श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेला हा भव्य दहीहंडी उत्सव खारघरकरांसाठी अविस्मरणीय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com