युवा महोत्सव हा महाविद्यालयीन जीवनातील महत्वाचा घटक
युवा महोत्सव महाविद्यालयीन जीवनातील महत्त्वाचा घटक
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन
मुरूड, ता. १८ (बातमीदार) ः शालेय, महाविद्यालय जीवनात युवा महोत्सव हा महत्त्वाचा घटक आहे. युवा महोत्सवांमधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळालेल्या संधीमुळे कलागुणांना वाव मिळत असतो, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवाच्या दक्षिण रायगड विभागाच्या जिल्हास्तरीय स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्यात अंजुमन डिग्री महाविद्यालय मुरूड येथे मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या वेळी मुंबई विद्यापीठाचे समन्वयक नीलेश कावे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष फैरोज घलटे, तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मनोज भगत, हसमुख जैन, मुरूड तालुका महिला अध्यक्षा ॲड. मृणाल खोत, डॉ. निस्सार बिरवाडकर, इम्तियाज मलबारी, प्राचार्य साजिद शेख, नम्रता कासार, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, तहसीलदार आदेश डफळ आदी मान्यवर उपस्थित होते.
आदिती तटकरे म्हणाल्या की, या महोत्सवात २४ महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळे कलागुण सादर करणार आहेत. यामध्ये चांगली कला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यास परदेशात संधी मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था युवा घडवण्याचे अमूल्य कार्य करीत आहेत. त्यांच्या योगदानामुळेच शिक्षणाची नवनवी दालने उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या युवा महोत्सवामध्ये रायगड दक्षिण विभागातून २४ महाविद्यालयातील जवळजवळ ४५० स्पर्धक विविध ३२ कलाप्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये नाटक, समूहनृत्य, वक्तृत्व, चित्रकला, कथाकथन, एकांकिका, समूहगीत, मूकअभिनय आदी कलाप्रकारांचा समावेश होता.
मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक नीलेश सावे, जिल्हा समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे व सहसमन्वयक डॉ. बालाजी राजभोज, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. स्वाती खराडे यांच्या अथक परिश्रमाने हा युवा महोत्सव यशस्वी होण्यास मदत झाली आहे. युवा महोत्सवात असंख्य महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.