झेडपीच्या शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर

झेडपीच्या शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर

Published on

झेडपीच्या शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर
लवकरच कामाला होणार सुरुवात
सकाळ वृत्तसेवा,
ठाणे, ता. १८ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठाणे जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा या महामार्ग अथवा मुख्य रस्त्यांच्या कडेला आहेत. त्यात या रस्त्यांवरून वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा अबधित राहो, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून झेडपीच्या एक हजार ३२८ शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बदलापूर येथील शाळेत घडलेल्या घटनेनंतर सर्वच शालेय प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वच शाळा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याबरोबरच सुरक्षा रक्षकांचीदेखील नेमणूक करण्यात येत आहे. अशातच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुर्गम व आदिवासी पाड्यांवर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यातील बहुतांश शाळा ह्या रस्त्याच्या कडेला आहेत. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेबाहेर पडत असताना, एखाद्या वाहनाने ठोकर देऊन अपघात होण्याच्या दुर्घटना घडत असतात. अनेक शाळांना संरक्षक भिंती बांधण्यात आल्या नाहीत. त्याचबरोबर शाळांच्या आवारात घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये सीटीव्ही कॅमेरा बसवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार आहे. याची दाखल घेत, ठाणे जिल्हा परिषद प्रशासनानेदेखील झेडपीच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

चौकट
विद्यार्थ्यांची सुरक्षा अबाधित राहण्यास होणार मदत
दरम्यान, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या एका हजार ३२८ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशासनाने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, ठेकेदार निश्चित करण्यात आले आहे. लवकरच कामाच्या कार्यादेश देण्यात येणार असून, कामास सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा अबधित राहण्यास मदत होणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com