नवी मुंबई मुसळधार पाऊसाने तुंबई

नवी मुंबई मुसळधार पाऊसाने तुंबई

Published on

मुसळधार पावसाने परीक्षा
नवी मुंबई जलमय, वाहतुकीला सर्वाधिक फटका
वाशी, ता. १९ (बातमीदार)ः हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसामुळे नवी मुंबईचे जनजीवन विस्कळित झाले. शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने ठाणे-बेलापर मार्गासह सायन-पनवेल महामार्ग, एमआयडीसीतील रस्ते जलयम झाले. या मुसळधार पावसाने जणू नवी मुंबईकरांची परीक्षाच घेतली.
रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे मंगळवारी सकाळच्या कामाला जाणाऱ्या कामगारांना पावसाचा फटका बसला. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकासमोरील चौकात, ऐरोली येथील माइंड स्पेस, ऐरोली रेल्वे स्थानक, रबाळे टी-जंक्शन, महापे भुयारी मार्ग, तुर्भे येथील रस्त्यावर पाणी साचले. पाणी साचल्यामुळे दिघा रेल्वे स्थानक, रबाळे टी जंक्शन तसेच वाशीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच ठाणेकडून वाशीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. पाच मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास कोंडीत अडकून पडावे लागले. सायन-पनवेल महामार्गावर पाणी साचल्यामुळे कोंडी झाली. एमआयडीसीतील रबाळे यादवनगर, तुर्भे येथे पाणी साचले.
---------------------
रेल्वे प्रवासात द्राविडी प्राणायम
रबाळे रेल्वेस्थानकाचा भुयारी मार्ग पाण्यात गेला. तीन फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे प्रवशांसाठी हा मार्ग बंद होता. त्यामुळे प्रवाशांना द्राविडी प्राणायम करीत दुसऱ्या बाजूने रेल्वेस्थानक गाठावे लागत होते. दिघा येथील सखल भाग असणाऱ्या गणपती पाडा, संजय गांधी नगर, बिदुंमाधव नगर परिसरामध्ये पाणी साचले.
-------------------------
शहर पावसाची नोंद(मिमी)
बेलापूर - ७२.६
नेरूळ - ८१
वाशी - १०३.६
कोपरखैरणे - ११२.८
ऐरोली - ७४.८
दिघा - ६७.४
----------------------------
वाहतुकीचा वेग मंदावला
दिघा येथील थॉमसन प्रेसजवळ, ऐरोली येथील रिलायन्स मॉलसमोर, ऐरोली सेक्टर १६ येथील मासळी मार्केट, रबाळे येथील टी जंक्शन, एमआयडीसी रस्त्यावरील यादवनगर परिसर, सानपाडा सबवे, जुईनगर सबवे पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. नवी मुंबईत सीबीडी-बेलापूर, वाशी, नेरूळ, ऐरोलीत झाडे कोसळण्याच्या घटनांची नोंद आहे.
---------------------------------
घरांमध्ये पाणी शिरल्याने धावपळ
दिघ्यातील नाल्यालगतच्या नामदेवनगरातील लक्ष्मी चाळ, तुरे चाळ, बिंदुमाधवनगरातील महालक्ष्मी चाळ, नवीन मित्रमंडळ, गणेशनगरजवळील पद्मावती चाळ येथील ४० ते ५० रहिवाशांच्या घरांमध्ये एक ते दीड फुटापर्यंत पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले. पाणी काढण्यासाठी पालिकेकडून पंप बसवण्यात आले होते. दरम्यान, घरातील फर्निचरसह धान्याचे नुकसान झाले. जवळपास २०० जणांचे जेवण पालिकेकडून देण्यात आले. सामाजिक कार्यकत्यांनीही मदतीचा हात दिला.
-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com