एकटेपणा, नैराश्याचा बालमनांवर आघात

एकटेपणा, नैराश्याचा बालमनांवर आघात

Published on

एकटेपणा, नैराश्याचा बालमनावर आघात
११७ अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी घटनांमध्ये सहभाग
सायली रावले ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २१ ः रायगड जिल्ह्यात घडलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये ११७ अल्पवयीन मुलांचा सहभाग उघड झाला आहे. यामध्ये बलात्कार, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश असून, पालकांच्या दुर्लक्षामुळे आलेल्या नैराश्याने बालमनावर आघात होत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून बालगुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. शिक्षण, सामाजिक वातावरण, व्यसनाधीनता, सोशल मीडिया, मोबाईलचा अतिवापर, चित्रपट, मालिकांमधून होणारे गुन्हेगारीचे उदात्तीकरण बालगुन्हेगारांच्या वाढीसाठी पोषक ठरत आहेत. अशातच बदललेल्या काळानुसार पालक दैनंदिन कामात अधिक व्यस्त असल्याने मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत आहे. आई-बाबांचे दुर्लक्ष होत असल्याने मुले त्यांच्यापासून दुरावल्याने नैराश्यातून गुन्हेगारीच्या वाटेवर जात आहेत.
------------------------------------------
एकटेपणाची कारणे
सतत मोबाईलवर गेम खेळणे, विविध प्रकारची गुन्हेगारी असलेले चित्रपट पाहणे, पालकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी घरात चिडचिड करणे, हट्ट करणे, एखादी गोष्ट न मिळाल्यास त्याचा राग येणे यातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागते.
-----------------------------------------
जानेवारी २०२४ ते जुलै २०२५ कालावधी
गुन्ह्यांचे प्रकार मुलांची संख्या
चोरी १६
धार्मिक भावना दुखावणे ३
घरफोडी १०
बलात्कार व विनयभंग ३६
अपघात ४
दुखापत १३
गर्दी मारामारी १९
हत्या ४
अमली पदार्थ १
शस्त्र अधिनियम १
जबरी चोरी २
सरकारी नोकरदारावर हल्ला १
आयटी ॲक्ट १
समाजात तेढ निर्माण करणे १
इतर ४
एकूण ११७
------------------------------------------
- अल्पवयीन गुन्हेगारांपैकी २८ मुले कर्जत निरीक्षणगृहात.
----------------------------------------
बालकांची काळजी, संरक्षण कायदा २०१८ :
बालकांची काळजी आणि संरक्षण कायदा ३१ डिसेंबर २०१५ रोजी पारित झाला. बाल गुन्हेगार शब्दाला नकारात्मक अर्थाच्या पलीकडे जाऊन कायद्याने गुन्हेगार म्हणून ठरवलेल्या बालकांची काळजी व संरक्षणाची जबाबदारी यातून स्पष्ट होते. अनाथ, पळून आलेली, भटकणारी, सोडून दिलेली, छोट्या मोठ्या गुन्ह्यात तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोप झालेली अशा गोष्टींचा मुलांच्या भविष्याच्या अधिकारांबाबत या कायद्यानुसार कामकाज केले जाते.
ृृृृृृृृृः-----------------------------------
बालकल्याण समितीची जबाबदारी
मुलांकडून गुन्हा घडला अथवा अनाथ, भटकणारी मुले ज्यांचे वर्तन समाजविरोधी असते, अशा मुलांना बालकल्याण सामिती अथवा बाल न्यायालय यांच्यासमोर सादर केले जाते. १८ वर्षांच्या आतील मुलांच्या गुन्ह्याबाबत तसेच समस्यांबाबत कमीत कमी काळात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे काम या मंडळाकडे आहे. बालकल्याण मंडळ मुलांचे वय सात ते १८ वर्षांखालील मुले-मुली ज्यांनी गुन्हा केला आहे, अशा बालकांविषयी निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार बाल न्याय मंडळास आहे.
------------------------------------------
उपाययोजना :
- जास्तीत जास्त निरीक्षणगृहांची स्थापना करणे.
- पालक, नातेवाइकांनी, शिक्षकांनी सतत संवाद साधावा.
- मित्र-मैत्रिणींबाबत शहानिशा करावी, चौकशी करावी.
- वर्तणुकीवर लक्ष ठेवावे, जर वागण्यात बदल जाणवल्यास समुपदेशकाकडे घेऊन जावे.
- योग्य, अयोग्य गोष्टींबाबत मार्गदर्शन.
- घरातील वातावरण सकारात्मक, हसते-खेळते ठेवावे.
- मोबाईल, फेसबुक, व्हिडिओ, ऑनलाइन गेम्स, सोशल मीडियाबाबत मार्गदर्शन.
- विचारलेल्या प्रश्नांना टाळू नये, हसू नये, शंकांचे निरसन करावे.
---------------------------------
कोट
बाल गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाची आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक वातावरण अशी कारणे असू शकतात. आपल्या भावनांची जाणीव होणे, त्या समजून घेणे, त्यांचा योग्य त्या पद्धतीने निचरा करू शकणे, हे मानसिक संतुलनाचे, आरोग्याचे महत्त्वाचे पैलू आहेत, पण त्यासाठी लागणारा वेळ पालक आणि मुलांकडेही नसतो. त्यामुळेच घुसमट, भांडण, कुणीच समजून घेत नाही, अशी भावना येत राहते. अनेकदा अनेक मुले मित्रांच्या दबावातून किंवा सिनेमा, सीरिज अशा माध्यमांना गुन्हे करताना दिसतात.
- मृण्मयी वैशंपायन, मानसोपचारतज्ज्ञ, पुणे
----------------------------------
रायगड जिल्ह्यात बाल न्याय मंडळ असून, गुन्हा किती गंभीर आहे, त्यावरून मुलाला निरीक्षणगृहात पाठविण्यात येते. चोरी अथवा भांडणासारखे विषय असतील आणि पालक जबाबदारी घ्यायला तयार असतील, तर मुलांबरोबर पालकांचे समुपदेशन करण्यात येते. असे क्वचितच घडते की, मुलांमध्ये सुधारणा होत नाही. निरीक्षणगृहात मुलांचे समुपदेशन केले जाते. त्यांना शिक्षणाची सोयही करण्यात येते.
- सुजाता सपकाळ, अतिरिक्त अधीक्षक, निरीक्षणगृह, कर्जत
------------------------------------
सध्याच्या मुलांमध्ये सहनशक्ती, एखादी गोष्ट स्वीकारण्याची शक्ती कमी असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा शिकवताना मुलांच्या आत्मविश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. अनेकदा कठोरही व्हावे लागते, पण पालकांनीही मुलांशी संवाद साधून त्यांना योग्य-अयोग्य याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. यासाठी पालकांनी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे गरजेचे आहे.
- सई म्हात्रे, माध्यमिक शिक्षिका
------------------------------
अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळतात याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मोबाईलचा अतिवापर, कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती असू शकते. याबाबत पोलिस प्रशासन म्हणून शाळा, कॉलेजमध्ये वारंवार गुन्हे, विविध नियम, कायदे याबाबत सातत्याने जनजागृती करीत आहोत.
- आंचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com