मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आईचे साकडे

मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आईचे साकडे

Published on

शुभांगी पाटील ः सकाळ वृत्तसेवा
तुर्भे, ता. २१ ः श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात पिठोरी अमावस्या येते. या दिवशी आई मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पिठोरी देवीची पूजा करतात. या दिवसाला श्रावण अमावस्या किंवा पोळा अमावस्या असेही म्हणतात, तर आगरी कोळी समाजात विशेष महत्त्व आहे.
नवी मुंबईच्या शहरीकरणाआधी महिला रानात जाऊन पिठोरीच्या पूजेसाठी पत्री आणत होत्या. आता औद्योगिकीकरणामुळे बाजारातील पत्री खरेदी करावी लागते. पत्री दिंड्यांच्या पानात आणली जाते. यामध्ये तेरडा, कागडा, कलई, लव, करडू, गोमती, नारळ, माका वनस्पतींचा समावेश असतो. तसेच कागदावर पिठोरी मातेच्या मुलासह असणाऱ्या प्रतिकृतींची पूजा केली जाते. लव्यापासून बनवलेली गोफ मुलाच्या गळ्यात घातला जातो. संध्याकाळी सहानंतर पिठोरीची पाटावर किंवा चौरंगावर प्राणप्रतिष्ठा केली जाते. या वेळी विड्याच्या पानावर पूर्ण सुपारी ठेवून दुर्वा, फुले, अक्षदा वाहून गणेशपूजन केले जाते. त्यानंतर पिठोरी मातेच्या प्रतीकात्मक फोटोची साडीचोळी, खण-नारळ हळदी-कुंकू, वेणी-फणी देऊन ओटी भरली जाते. या वेळी पूजेसाठी केळी, काकडी आवर्जून ठेवली जाते.
---------------------------------------------
पंचपकवान्नांचा बेत
श्रावण अमावस्येच्या दिवशी दिवसभर घरातील स्त्रिया उपवास करतात. संध्याकाळी अंघोळ करून तांदळाच्या राशीवर चौसष्ट सुपाऱ्या मांडून त्यावर चौसष्ट योगिनींचे आवाहन करतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. उकडीचे मोदक पिठाचे लाडू, पाटा-वरवंटा, पिठाचे दिवे, पिठाचे दागिने केले जातात. त्यावरून पिठोरी अमावस्या असे नाव पडले आहे. या दिवशी वरण-भात, उकडीचे मोदक, तांदळाची खीर, सात प्रकारची मिश्र भाजी, अळूची देठ घालून वाटाण्याची भाजी, असा जेवणाचा बेत असतो.
------------------------------------
सणामागची पौराणिक कथा
विदेहा नावाच्या स्त्रीचे दर श्रावण अमावस्येला झालेले मूल मृत्युमुखी पडत होते. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा कठोर तपश्चर्या केली. चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले. अशा प्रकारे संतती रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला सामर्थ्याची जाणीव पिठोरी अमावस्या करून देते.

Marathi News Esakal
www.esakal.com