अलिबागमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्तींना मागणी
अलिबागमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्तींना मागणी
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे गणेशभक्तांचा कल
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) ः गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे गणेशभक्तांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. गणेशभक्तांमध्ये हळूहळू पर्यावरणविषयक जागृती होत असून, शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीच्या मागणीत वाढ होत आहे. यावर्षी जिल्ह्यातील जवळपास ४० ते ५० टक्के गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक मूर्तीची मागणी कारखानदारांकडे केली आहे.
गणेशोत्सव जवळ येताच मूर्ती कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. कच्च्या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या असून, मूर्तीची रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गणेशभक्तांची पावले मूर्ती कारखान्यांकडे वळू लागली असून, आपल्याला हव्या असलेल्या गणेशमूर्तीची आगाऊ नोंदणी भक्त करीत असल्याचे चित्र दिसून येते.
मागील काही वर्षांपासून अलिबागमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये शाडू माती, कागदी लगदा आणि इतर नैसर्गिक सामग्रींपासून बनवलेल्या गणेशमूर्ती बनविण्यात येतात. आता गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्तीला रंगरंगोटी करण्याचे काम कारखान्यांमध्ये सुरू आहे. पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने जलप्रदूषण होते. शाडू माती आणि कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल आहेत. या मूर्ती नैसर्गिक सामग्रीतून बनवल्या जातात, जसे की शाडू माती, कागदी लगदा, रंग आणि इतर नैसर्गिक घटक. पर्यावरणपूरक मूर्तीदेखील आकर्षक आणि कलात्मकरित्या बनविण्यात येत आहेत. त्यामुळे गणेशभक्तांच्याही पसंतीस अशा मूर्ती उतरत आहेत. अनेक गणेशभक्त आपल्या पसंतीप्रमाणे आधीच सांगून गणेशमूर्ती तयार करून घेत आहेत. नागरिकांमध्येही पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता वाढत असल्यामुळे, ते पर्यावरणपूरक पर्याय निवडणे पसंत करतात.
...............
सध्या शाडू मातीच्या सव्वा ते दीड फुटांच्या मूर्ती अडीच ते तीन हजार रुपये, तर पीओपीच्या मूर्ती दोन हजार रुपयांपर्यंत विक्री केल्या जात आहेत. शाडूची माती, रंगरंगोटी साहित्य यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने मूर्तींच्या किमतींमध्येही सुमारे १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे गणेशमूर्ती कारखानदारांनी सांगितले.
...............
आम्ही पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या व पीओपी गणेशमूर्तीदेखील घडवतो. आता गणेशोत्सव जवळ आल्याने भक्तांची गर्दी होत आहे. अनेक जण शाडू मातीची मूर्ती घेण्यास पसंती दर्शवित आहेत. ज्याप्रमाणे ऑर्डर असते, त्याप्रमाणे आम्ही मूर्ती घडवून देत असतो.
-हर्षल पाटील, श्री कला केंद्र, रामनाथ-कुंभार आळी, अलिबाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.