अपघाताला निमंत्रण देणारा पावसाळी प्रवास

अपघाताला निमंत्रण देणारा पावसाळी प्रवास

Published on

वसई, ता. २१ (बातमीदार) : वसई-विरार शहरात या आठवड्यात पावसाने कहर माजवल्याने नागरिकांचे अक्षरशः हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने प्रवास करणेदेखील धोकादायक बनले आहे. अनेक मार्गांवर अपघाताला निमंत्रण देणारे खड्डे पडले आहेत. प्रशासनाकडून पावसाचे कारण देत कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने सुजाण नागरिकांनी या खड्ड्यांपासून चालकांना सावध करण्यासाठी ठिकठिकाणी विविध वस्तूंचा वापर केला आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान खड्डे असल्याचे नागरिकांसह चालकांना समजून येत आहे.

वसई पश्चिमेतील साईनगर चौकात काही दिवसांपूर्वी चेंबर बसविण्यात आला, मात्र आजूबाजूला नादुरुस्त आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होते. त्यामुळे चेंबरच्यावर एक मोठे लोखंडी टेबल ठेवण्यात आले आहे, जेणेकरून नागरिकांना प्रवास करताना धोका उद्भवणार नाही. वसई गाव, गिरीज, वसई मार्गावर मोठे खोल खड्डे निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी गिरीज येथून दुचाकी घेऊन जाताना मागे बसलेल्या महिला खड्ड्यांमुळे पडल्या व त्यांना दुखापत झाली होती.

दोन दिवस पडलेल्या पावसामुळे पाणी साचल्याने चालकांना अंदाज येत नाही. परिणामी खड्ड्यांमध्ये वाहन आपटतात, म्हणून ड्रम कापून काठीच्या साह्याने तो ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या खड्ड्यांत लावण्यात आल्या असून, अन्य एका मार्गावर मोठी काठी ठेवली आहे, ज्यामुळे नागरिकांना प्रवास करताना खड्डा असल्याची जाणीव होते. त्यामुळे अन्य वाहनचालक सावध होत आहेत आणि दुर्घटना टळत आहेत.

वाहने बंद पडल्याने त्रास
वसई-विरार महापालिकेने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले असल्याचे स्पष्ट केले असले तरी मुसळधार पावसाळ्यात नवीन खड्ड्यांचा अडसर निर्माण होत आहे. पाणी साचल्याने अनेक भागात वाहने बंद पडून चालकांसह प्रवाशांना त्रास होत आहे.

सजग नागरिकांचा पुढाकार
महापालिकेने या खोल झालेल्या खड्ड्यांबाबत उपाययोजना केली नसली तरी प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ नये, दुर्घटना घडू नये म्हणून नागरिकांनी पुढे येत सावधानतेचा इशारा देत असल्याचे दिसून येत आहे, मात्र रस्ते दुरुस्त कधी होणार, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com