भिवंडी-वाडा रस्त्याची दयनीय अवस्था

भिवंडी-वाडा रस्त्याची दयनीय अवस्था

Published on

भिवंडी-वाडा रस्त्याची दयनीय अवस्था
टोल बसवून रस्ता दुरुस्ती करण्याची संतप्त मागणी
वज्रेश्वरी, ता. २३ (बातमीदार) : भिवंडी-वाडा मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालक, प्रवासी, दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी, भाजीपाला विक्रेते, अशा सर्वच स्तरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा महामार्ग धोकादायक अवस्थेत असून त्याच्या दुरुस्तीची मागणी वारंवार होत असतानाही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

भिवंडी-वाडा मार्गावर सतत खड्ड्यांमुळे अपघात होतात. अनेकांनी अपघातात प्राण गमावले, काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून वाहनदुरुस्ती, टायर, स्पेअर पार्ट विक्रेत्यांचा व्यवसाय बहरला आहे; पण सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास खडतर बनला आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरू झाले असले, तरी ठेकेदारांना निधी वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांनी काम थांबवले. परिणामी, रस्त्याची स्थिती जशीच्या तशीच राहिली आहे. यामुळे सरकारच्या भूमिकेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. एकदा तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रस्त्यावरून प्रवास करावा. तेव्हा त्यांनाही येथील प्रवाशांचे हाल समजतील, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

पावसाळ्यात होडी प्रवासाचा आनंद
रस्त्याची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे, की पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास केल्यास ‘नौका विहार’ केल्याचा भास होतो, अशा उपरोधिक प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील होडीचा आनंद पावसात या रस्त्यावरूनही मिळू शकतो, हेच सांगणे काही नागरिक विनोदाने व्यक्त करीत आहेत.

टोल लावा पण रस्ता सुधारा
काही जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे, की या मार्गावर टोल वसूल करावा. त्यातून मिळणारा निधी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वापरला जावा. कारण सरकारकडून निधी वेळेवर मिळत नसेल, तर टोलच्या माध्यमातून निधी गोळा करून काम मार्गी लावले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com