घोडबंदर रोडवर ८०० खड्डे
घोडबंदर रोडवर ८०० खड्डे
गणपतीसमोर अडथळ्यांचे विघ्न
ठाणे, ता. २३ (बातमीदार) : घोडबंदर रोडवर सुमारे ८०० खड्डे पडल्यामुळे येथील वाहतूक कोंडी व अडथळे वाढले आहेत. गणपतीच्या आगमनाच्या अगोदरच या खड्ड्यांमुळे भक्तांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते गुजरात, वसई, पालघरकडे घोडबंदरमार्गे रोज हजारोंच्या संख्येने ये-जा करणारी जड-अवजड वाहनांची वाहतूक, अतिवृष्टीमुळे रस्त्यांची झालेली चाळण आणि रस्ता रुंदीकरण करताना मधोमध आलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारा, खांब, विद्युत जनित्रांच्या अडथळ्यांचे डोंगर पार करून गणपती बाप्पांच्या मूर्ती घरी, मंडपात कशा आणायच्या, अशी चिंता गणेशभक्तांना सतावू लागली आहे. संतापाची बाब ही आहे, की अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीच्या अगोदर या मार्गावर पडलेले खड्डे आणि इतर अडथळे दूर करणे प्रशासनाला अशक्य असल्याने यंदा घोडबंदरकरांना अडथळ्यांच्या विघ्नांचा सामना करत गणेशाचे स्वागत करावे लागणार आहे.
घोडबंदर मार्गाच्या दुतर्फा गेल्या दशकभरात उच्चभ्रूंचे नवे ठाणे उभे राहिले आहे. या नव्या नियोजित ठाण्याला पसंती देत अनेक सेलिब्रिटी, दिग्गज येथे राहायला आले आहेत; परंतु काही वर्षाच्या कालावधीतच यांचा स्वप्न भंग झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मार्गावरील रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीने घोडबंदरकर त्रस्त झालेला असतानाच सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीसी आणि ठाणे महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे या मार्गाच्या रुंदीकरणाचे नियोजन फसलेले दिसत आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या सलग पाच दिवसांच्या अतिवृष्टीमुळे या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
भक्तांसमोर संकट
मार्गावर गायमुख घाटापर्यंत दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यांची संख्या ८०० पेक्षा जास्त आहे. संतापाची आणखी एक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच वडवली येथील वाहतूक कोंडी दूर व्हावी, यासाठी येथे उड्डाणपूल बांधला आहे. त्या पुलाचे उद्घाटन मंत्र्याच्या हस्ते करण्यात येणार म्हणून पुलाच्या दोन्हींकडील खालील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी दोन्ही बाजूंकडील रस्त्यांवर रातोरात डांबर पसरवून चांगले केले होते; मात्र काही दिवसांतच पुन्हा या रस्त्यांवर खड्डे पडून त्यांची अवस्था जैसे थे झाली आहे. त्यामुळे खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यावरून गणपती बाप्पाची मूर्ती घरी कशी आणायची, असे संकट भक्तांसमोर उभे राहिले आहे.
खड्डे पडलेली ठिकाणे
मानपाडा
कासारवडवली सिग्नल
आनंदनगर
पातलीपाडा
हिरानंदानी चौक
भाईंदर पाडा
नागला बंदर
गायमुख चौपाटी
गायमुख घाट
ढोकाळी-कशेळी रस्ता
मेट्रो साहित्यांमुळे अडथळे
कापूरबावडी नाका
विद्यापीठ
माजिवडा
चितळसर पोलिस ठाणे
हिरानंदानी चौक
मानपाडा
अर्धवट राहिलेली कामे
सूरज वॉटर पार्क
चितळसर पोलिस ठाणे
हिरानंदानी चौक
आनंदनगर
नागला बंदर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.