विक्रोळी कन्नमवारनगरमध्ये रस्त्यांवर खड्डेच खड्डे
विक्रोळी कन्नमवारनगरमध्ये रस्त्यांवर खड्डेच खड्डे
घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) ः गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना मुंबईतील रस्त्यांना अद्याप खड्ड्यांपासून मुक्ती मिळाली नसल्याचे चित्र आहे. विक्रोळीतील कन्नमवारनगरातील रस्त्यांचीदेखील अशीच अवस्था पाहायला मिळते. येथील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने येथील वाहतूक मंदावली आहे.
विक्रोळीतील कन्नमवारनगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रिक्षाचालक व दुचाकीचालकांना मणक्याचा त्रास होत असल्याचे काही रिक्षाचालकांनी सांगितले. पुढील आठवड्यात गणपतींचे आगमन होत आहे. तरीही मुंबईतील रस्ते अद्यापही खड्डेमुक्त झाले नसल्याचे नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांचा पाढा सुरू झाला आहे. नागरिकांचा प्रवास धोकादायक झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे. येणाऱ्या गणेशोत्सवात लाखो भाविक रस्त्यावर असतात, त्यामुळे खड्डेमुक्त रस्त्यांची तत्काळ व्यवस्था करणे महापालिकेची जबाबदारी आहे.
- डॉ. वेदप्रकाश तिवारी,
वकील, मुंबई उच्च न्यायालय
खड्ड्यांमुळे लोकांना पाठदुखी, मानेचे विकार, अपघात, आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विक्रोळीत खड्डे बुजवण्याचे काम केवळ दिखावा ठरत आहे. जनतेची फसवणूक सुरूच आहे. खड्डे हे फक्त रस्त्यांवर नाहीत, तर लोकांच्या शरीरावर कायमस्वरूपी जखमा करत आहेत. विक्रोळीतील खड्ड्यांमुळे नागरिकांची तब्येत खालावत आहे आणि प्रशासन डोळेझाक करीत आहे.
- डॉ. योगेश भालेराव