
माळशेज घाटात किरकोळ खड्डे
सरळगाव-नढई रस्त्यावर अपघाताचा धोका
मुरबाड, ता. २३ (वार्ताहर) : मुरबाड-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात सध्या रस्त्यांची अवस्था एकूणात चांगली असली तरी मागील चार ते पाच दिवसांत झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ खड्डे पडले असल्याचे चित्र दिसून येत आहे. या खड्ड्यांमुळे घाटात वाहनचालकांनी खबरदारीने प्रवास करण्याची गरज आहे.
माळशेज घाटापेक्षा अधिक चिंताजनक परिस्थिती ही सरळगाव ते नढईदरम्यानच्या रस्त्यावर पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेक खड्डे खोल असून त्यामधून दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुरबाड उपविभागाचे उपअभियंता धनाजी टिले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले, की माळशेज घाटातील किरकोळ खड्डे लवकरच बुजवण्यात येणार आहेत. सरळगाव ते नढईदरम्यान जे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्याबाबतीतही तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील.
वाहनचालकांसाठी सूचना
परिस्थिती पाहता नागरिकांनी आणि विशेषतः वाहनचालकांनी पुढील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे-
घाटात रात्री किंवा पावसात प्रवास टाळावा.
खड्ड्यांमुळे अचानक ब्रेक लागण्याची शक्यता असल्यामुळे वेग मर्यादित ठेवावा.
रस्त्यावर पाणी साचल्यास, खड्ड्यांचा अंदाज येणे कठीण असल्याने जास्त सावधगिरी बाळगावी.