पूर ओसरला, आता जलजन्य आजारांचा धोका
पूर ओसरला, आता जलजन्य आजारांचा धोका
घरोघरी भेठी देत रुग्णांचा शोध घ्या; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश स्थिती निर्माण झाली होती. पावसाचा जोर ओसरला तरी जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज असून, राज्यातील रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत.
घरोघरी सर्वेक्षण करत जलजन्य आजारांच्या रुग्णांचा शोध घेत तातडीने उपचार करण्यात यावेत. तसेच कुठल्याही आजारांवर उपचारासाठी सर्व रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध करा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले.
पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावी उपाययोजना करावी. आरोग्य विभागातील सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी, औषधपुरवठा व साधन सामग्री अद्ययावत ठेवावी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी हजर राहावे, शासकीय वाहने सुस्थितीत ठेवावीत, असे निर्देश मंत्री आबिटकर यांनी दिले आहेत. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाने पावसाळ्यातील आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वंकष तयारी केली असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
पिण्याच्या पाण्याची दररोज तपासणी!
राज्यात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी गढूळ येण्याची शक्यता अधिक आहे. दूषित पाण्यामुळे आजार पसरू नयेत यासाठी पिण्याच्या पाण्याची दररोज तपासणी करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नये!
पुरातील पाण्यात वाहून आलेले व शिळे अन्न खाऊ नये, मलेरिया प्रतिबंधासाठी डासजाळीचा वापर करावा, फक्त ताजे अन्न खावे, उकळलेले पाणीच प्यावे, जंतुनाशक वापरावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.