पान ४ बातम्या
कर्तव्यावर असताना महिला अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा
- शासनाच्या नियमांना केराची टोपली
अंबरनाथ, ता. २६ (वार्ताहर) : शासकीय नियम धाब्यावर बसवून अंबरनाथ नगर परिषदेच्या एका महिला अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर असताना आपला वाढदिवस पालिकेच्या केबिनमध्ये साजरा केला. १८ ऑगस्ट रोजी वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. आस्थापना विभागाचे प्रमुख मेघा कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पालिकेच्या सुरक्षा रक्षक आणि काही कर्मचारीही उपस्थित होते. यादरम्यानचे फोटो आता समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
कार्यालयीन ठिकाणी वाढदिवस, कार्यक्रम किंवा वैयक्तिक सोहळे करू नयेत, असे राज्य शासनाने कायदा करूनही अंबरनाथ नगर परिषदेच्या महिला अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर असताना वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या कृतीने शासनाच्या आदेशाला जणू केराची टोपली दाखवल्याची चर्चा शहरात सुरू झाली. मेघा कदम यांच्याकडे पालिकेची चार प्रमुख खाती आहेत. एका जबाबदार पदावर असताना त्यांच्या या कृतीने नागरिकांच्या भुवया उंचावल्या असून, विविध स्तरांतून टीका होत आहे. दरम्यान, कोणत्याही नियमांना न जुमानता आपला वाढदिवस कार्यालयात साजरा केल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सुनील अहिरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली.
शिस्तभंगाची कारवाई
शिस्त व अपील १९७९ महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम कोणताही कर्मचारी, अधिकारी शासकीय कार्यालयीन वेळेत, कार्यालयात वैयक्तिक किंवा धार्मिक व सामाजिक कार्यक्रम करू शकत नाहीत. तसेच नियमभंग केल्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा आदेश राज्य शासनाच्या सामान्य विभागाचा आहे.
नियम डावलून, पदाचा गैरवापर करून वाढदिवस साजरा करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली. शहरात खड्ड्यांचा प्रश्न, पाणीटंचाई, गटारांची दुर्दशा अशा गंभीर समस्यांवर उपाय काढायला वेळ नाही, मात्र केक कापायला वेळ आहे.
- सुनील अहिरे, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष
नोट : सोबत फोटो जोडलेले आहे.