प्रभाग रचनेविरोधात पक्षांची मोर्चेबांधणी
प्रभागरचनेविरोधात पक्षांची मोर्चेबांधणी
ठाकरे सेना कोर्टात जाण्याच्या तयारीत, अनेकांचे प्रभाग फुटले
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २४ ः नवी मुंबई महापालिका आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पालिकेच्या संबंधित विभागाने प्रभागरचनांचा प्रारूप आराखडा जाहीर केला. या आराखड्यानुसार अनेक जणांचे प्रभाग फुटले असून, दुसऱ्या प्रभागांना जोडण्यात आल्याच्या तक्रारी राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केल्या जात आहेत. हा आराखडा सत्ताधारी धार्जीण असून, त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केली आहे.
कोविडमुळे रखडलेली महापालिकेची निवडणूक आता तब्बल पाच वर्षांनी होत आहे. डिसेंबरनंतर निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यानुसार निवडणूक विभागाने १११ प्रभागांचे तयार केलेले पॅनेलनिहाय प्रभागरचना जाहीर केल्या. या प्रभागरचनेवर ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना सादर करायच्या आहेत, मात्र जाहीर केलेल्या रचनेत अनेक प्रभागांच्या सीमा चुकीच्या पद्धतीने जोडल्या गेल्याचा आरोप स्थानिक माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांनी केले आहेत. सीवूड्स येथील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपशहरप्रमुख समीर बागवान यांनी ही प्रभागरचना सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार तयार केल्याचा आरोप केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि नगरविकास विभागाने जून २०२५ मध्ये जारी केलेल्या शासन आदेशानुसार प्रभाग निश्चित करताना भौगोलिक एकसंधता व नैसर्गिक सीमा पाळणे बंधनकारक आहे. तरीसुद्धा सीवुड्समधील एकसंध परिसर मैदान, झाडी व पाण्यातून कृत्रिम रेषा ओढून तोडण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रभाग निश्चित करताना लोकसंख्या व सामाजिक घटकांचा न्याय्य विचार करणे आवश्यक आहे. आरोग्य केंद्र, बाजारपेठ, स्मशानभूमी, शाळा यासारख्या सामाजिक सुविधा असलेल्या प्रभागातच परिसराचा समावेश करणे आवश्यक असताना, सेक्टर-४० आणि ४२ हा परिसर सिवूड्सपासून तोडण्यात आला.
---------------------------------
नागरिकांचा गोंधळ
राज्य निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेतल्यास अधिसूचना व नकाशे यामध्ये पूर्ण ताळमेळ असणे बंधनकारक आहे, मात्र प्रभाग २५, २४ व २६ मध्ये अधिसूचना व नकाशे एकमेकांशी विसंगत आहेत. हे निवडणूक पारदर्शकतेच्या मूलभूत अटींचे उल्लंघन आहे. सीवूड्सचे सेक्टर-४०, ४२ आणि केंद्रीय विहार हे नेरूळच्या प्रभागात जोडले गेले आहेत. हा परिसर प्रत्यक्षात बेलापूर विभाग कार्यालयाच्या अंतर्गत येतो. यामुळे नागरिकांना आपली समस्या कोणाकडे मांडायची याबाबत गोंधळ होणार आहे.
------------------------------------
तुर्भे प्रभागात १४ गावांचा समावेश
तुर्भे परिसर हा चौदा गावांना जोडण्यात आला आहे. कातकरी पाडा, श्रमीकनगर, पावणे गाव अर्धा, आडवली-भूतवली हा सर्व परिसर पूर्वीच्या प्रभाग क्रमांक ६८ व ६९ जोडण्यात आला आहे. आता प्रभाग क्रमांक १४ नव्याने तयार झाला आहे. मुळात प्रभागात तुर्भे स्टोअर, पावणे, गणपती पाडा हा भाग होता. आता अतिरिक्त रहिवासी संख्या वाढल्याने ४४ हजारांचा पॅनेल झाला आहे. तुर्भे स्टोअर, हनुमान नगर, आंबेडकर नगर, गणेश नगर आणि इंदिरानगर, चुनाभट्टी, बोन्सरी, शिवाजीनगर, गांधीनगर, सीबीडी खिंडीजवळील पाठीमागचा परिसर असा २० क्रमांकाचा प्रभाग तयार झाला आहे, अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी दिली.
------------------------------------
दिघा परिसरातील प्रभाग ४ मधील ८० टक्के भाग फोडून दूसऱ्या प्रभागात टाकण्यात आला आहे. हा भाग फोडून प्रभाग क्रमांक १ ला जोडण्यात आला आहे, तर पॅनेल क्रमांक २ माजी नगरसेविका दीपा गवते आणि अपर्णा गवते यांच्या जुन्या प्रभागाला जोडण्यात आला आहे, मात्र याबाबत आम्ही तक्रार करीत बसण्यापेक्षा लढण्यावर विश्वास ठेवतो. आम्ही लढू आणि जिंकूसुद्धा.
- नवीन गवते, माजी नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.