गडकरी खुले होताच रंगला राजकीय भोंडला
रंगायतनमध्ये राजकारण
गडकरी खुले होताच रंगला राजकीय भोंडला; कलाकारांसह नाट्यप्रेमींमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : शहराचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रदीर्घ काळानंतर नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर नाट्यगृहात नाटकाची तिसरी घंटा वाजण्याऐवजी राजकीय कार्यक्रमांचा भोंडला अधिक रंगल्याचे दिसून आले. त्यामुळे नाट्यगृह नेमके कोणासाठी नाटकांच्या प्रयोगासाठी की राजकीय कार्यक्रमांसाठी, असा सवाल आता कलाकारांसह नाट्यप्रेमींमधून विचारला जावू लागला आहे.
राम गणेश गडकरी रंगायतन वास्तूच्या दुरुस्तीचे काम ठाणे पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आले. त्यामुळे गडकरी रंगायतन हे दुरुस्तीच्या कामासाठी मागील आठ ते १० महिन्यांपासून बंद होते. प्रदीर्घ कालावधीनंतर गडकरी रंगायतन नव्या रूपात सुरू झाले. त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या ठिकाणी नाटकाच्या प्रयोगांऐवजी राजकीय कार्यक्रमांचा भोंडला रंगल्याचे दिसून आले. त्यामुळे कलाकारांसह नाट्यप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
या नाट्यगृहात पहिलाच कार्यक्रम शिंदे सेनेच्या वतीने मंगळागौरचा आयोजित केला होता. त्या वेळी शिंदे यांनी लाडकी सून योजनेची घोषणा करून टाकली. त्यानंतर २१ तारखेला याच नाट्यगृहात मनसेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते, परंतु ऐनवेळेस हा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशातच गणेश नाईक यांचा जनता दरबार हा डॉ. काशिनाथ घाणेकर या नाट्यगृहात आयोजित केला होता, मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापल्याने आणि शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्यात हेरण्यासाठी नाईकांचा जनता दरबार २२ ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन येथे झाला.
आता २३ तारखेला याच रंगायतनमध्ये संजय वाघुले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या वतीने या ठिकाणी सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याच दिवशी सायंकाळी ठाकरे सेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनेदेखील एका कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती गडकरी रंगायतन व्यवस्थापनाने दिली.
नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग आधी की राजकीय कार्यक्रम आधी हेच काही समजत नाही. त्यामुळे हा विषय नाट्य कलाकारांसाठी नेहमीच चिंतेचा विषय आहे. त्यामुळे नाट्य कलाकारांमध्येदेखील नाराजी आहे. किमान शनिवार आणि रविवार वगळून ज्या दिवशी नाटकांचे प्रयोग नसतील, त्या दिवशी राजकीय कार्यक्रमांना नाट्यगृह द्यावे.
- विजू माने, दिग्दर्शक
गडकरी रंगायतन ठाणे हे नाट्यरसिकांसाठी, रंगकर्मींसाठी व कलासंस्कृतीसाठी उभारलेले एक महत्त्वाचे केंद्र आहे. नुकतेच त्याचे बांधकाम पूर्ण झाले, परंतु आतापर्यंत त्या ठिकाणी एकही नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम झाला नाही. उलट त्या जागेचा वापर राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांसाठी, जनता दरबारासाठी होत असल्याचे पाहून मनोमन खेद वाटतो.
- सायली पावसकर, नाट्यकलाकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.