उल्हासनगरच्या राजकारणात नवे वारे :

उल्हासनगरच्या राजकारणात नवे वारे :

Published on

उल्हासनगरच्या राजकारणात नवे वारे
ओमी कलानींच्या सारथ्यात श्रीकांत शिंदे यांचा प्रवास
उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी (ता. २४) ओमी कलानी यांच्या वाहनातून प्रवास केले. एकेकाळी दोस्ती का गठबंधन या नावाने लोकसभा निवडणुकीत एकत्र आलेले हे समीकरण आता पुन्हा दृढ दिसणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ओमी कलानींच्या सारथ्यात श्रीकांत शिंदेंचा हा प्रवास केवळ साधा दौरा नव्हता, तर पालिका निवडणुकीतील संभाव्य आघाड्यांचे चित्र उभं करणारा आहे. शहरात भाजप आणि कलानी गटातील वादंग वाढत असताना दोघांच्या प्रवासामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उल्हासनगरातील राजकारण नेहमीच नवनव्या समीकरणांमुळे रंगतदार ठरते. आठ वर्षांपूर्वी भाजपने कलानींच्या करिष्म्याचा वापर करून पालिकेवर सत्ता मिळवली होती, मात्र मतभेदांनंतर कलानींनी पुन्हा शिवसेनेची गाठ धरली आणि महापौरपद शिवसेनेला मिळवून दिले. त्यानंतरची शिवसेना-कलानी जवळीक लोकसभा निवडणुकीत आणखी ठळक झाली, ओमी कलानी यांनी महायुतीऐवजी फक्त श्रीकांत शिंदेंना पाठिंबा देत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. त्यावेळीच या समीकरणाला दोस्ती का गठबंधन असं नाव मिळालं.
लोकसभा निवडणुकीनंतरही या समीकरणाचा प्रभाव कायम राहिला. ओमी कलानींच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंची वारंवार भेट घेतली होती. रविवारी सुरू असलेल्या चालिया उत्सव, गणेश मंडळांच्या मूर्ती मुखदर्शन कार्यक्रमांदरम्यान शिंदे-कलानी पुन्हा एकत्र दिसले.

भाजपविरोधी आघाडीचं स्वरूप
उल्हासनगरच्या राजकीय रणांगणात आता भाजप विरुद्ध कलानी संघर्ष उफाळून आला आहे. शहरातील विविध समस्या घेऊन ओमी कलानी आणि त्यांच्या सहकारी थेट भाजप आमदार कुमार आयलानी यांच्यावर निशाणा साधत आहे. यामुळे कलानी गट आणि भाजप यांच्यातील वैर आता उघडपणे दिसू लागले आहे. ओमी कलानी केवळ कुमार आयलानींवरच नव्हे, तर थेट भाजपवरही तुटून पडत आहेत. विशेष म्हणजे, कलानी गटाची शिवसेनेतील श्रीकांत शिंदे यांच्याशी वाढती जवळीक एक नवे समीकरण मानलं जात आहे. यामुळेच शिंदेंची जवळीक कलानींसाठी राजकीय कवच ठरते का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेच्या रणांगणात शिवसेना-कलानी समीकरण भाजपविरोधी आघाडीचं स्वरूप धारण करतंय का, यावर आता दबक्या आवाजात चर्चा रंगू लागली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com