रोहा,रत्नागिरी व कणकवली येथे लोहमार्ग पोलीस ठाण्यांना मंजुरी
कोकण रेल्वेतून सुरक्षित प्रवास
रोह्यात लोहमार्ग पोलिसांचे नवीन ठाणे, गुन्हेगारीला बसणार आळा
रोहा, ता. २६ (बातमीदार)ः रायगड जिल्ह्यातील रोहा, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरी येथील नवीन लोहमार्ग पोलिस ठाणे दोन दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहेत.
बदलत्या परिस्थितीनुसार रेल्वे विभागात होत असलेले बदल, प्रवाशांची वाढती संख्या आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हार्बर लोहमार्ग परिमंडळ, कोकण लोहमार्ग विभाग तसेच रोहा, रत्नागिरी आणि कणकवली या ठिकाणी नवीन लोहमार्ग पोलिस ठाणी सुरू करण्याचा प्रस्ताव अपर पोलिस महासंचालकांनी (नि.व.स.), महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत शासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून ७ ऑगस्ट २०२५ रोजी मान्यता मिळाली. त्यानुसार रत्नागिरी येथे हे पहिले पोलिस ठाणे सुरू झाले आहे. मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या पोलिस ठाण्याचे उद्घाटन पोलिस महासंचालक (लोहमार्ग), (महाराष्ट्र राज्य), प्रशांत बुरडे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. या नव्या पोलिस ठाण्यामुळे कोकण रेल्वेच्या हद्दीतील प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
-----------------------------------
पनवेलची हद्द विस्तारणार
नव्या पोलिस ठाण्यामुळे पनवेल रेल्वे पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातही वाढ झाली आहे. पनवेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे आणि रोहा ही स्थानके समाविष्ट करण्यात आली आहेत. रत्नागिरी आणि पनवेल ही दोन्ही पोलिस ठाणी आता सहाय्यक पोलिस आयुक्त हार्बर विभाग यांच्या अंतर्गत काम करतील. पोलिस उपायुक्त, मध्य परिमंडळांच्या थेट नियंत्रणाखाली असतील.