गणेशोत्सवापूर्वी मूर्तिकार गायब
गणेशोत्सवापूर्वी मूर्तिकार गायब
डोंबिवलीतील आनंदी कला केंद्रात भाविकांचा गोंधळ
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाल्यावर कालपासून भक्तगण कारखान्यातून आपल्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत; मात्र गणेशोत्सवाच्या एक दिवस आधीच डोंबिवलीत एका प्रसिद्ध मूर्ती कारखान्यात भाविकांची धांदल उडाली आहे. डोंबिवली पश्चिमेतील आनंदी कला केंद्राचे मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे अचानक गायब झाल्याने अनेकांनी बुक केलेल्या मूर्ती मिळाल्या नाहीत. काहींच्या मूर्ती अपूर्ण अवस्थेत होत्या, तर काही भाविक हाताला लागेल ती मूर्ती घेऊन परतताना दिसले.
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मूर्ती आणण्यासाठी भाविक कारखान्यात गर्दी करतात, परंतु मंगळवारी (ता. २६) सकाळपासून आनंदी कला केंद्रावर गोंधळाचे वातावरण होते. मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे हे जागेवर अनुपस्थित होते. तसेच अनेक भाविकांना त्यांनी बुक केलेल्या मूर्ती मिळाल्या नाहीत, तर काही मूर्तीचे काम अपूर्ण होते. त्यामुळे निराश झालेल्या अनेकांनी मूर्ती न मिळाल्यास काय? या विचाराने हाताशी लागणारी कोणतीही मूर्ती उचलून नेण्यास सुरुवात केली. यामध्ये काहींच्या मूर्ती रंगाविना, तर काही अर्धवट स्थितीत होत्या.
भाविक प्रफुल्ल तांबडे यांना फोन करत होते; मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. काही मंडळांना मूर्ती वेळेत मिळाल्या असल्या तरी, अनेकांचे मूर्तींबाबतचे स्वप्न अपूर्ण राहिले. यामध्ये मुलुंड, भांडुप, कळवा अशा ठिकाणांहून आलेल्या भाविकांचाही समावेश होता. संबंधित प्रकरणाची विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कारखानदाराने अपेक्षेपेक्षा जास्त ऑर्डर घेतल्याने त्या वेळेत पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि त्यातूनच हा गोंधळ निर्माण झाला. मूर्ती रंगवण्यासाठी बाहेरून काही कलाकार बोलावले होते; मात्र मूळ मालकाच्या अनुपस्थितीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
महिनाभरापूर्वी आम्ही मूर्ती बुक केली होती. जर पाचशे सहाशे रुपये भरले असते, तर ठीक होते, पण आम्ही तर थेट तीन हजार रुपये आधीच भरले. आता दुसरीकडे मूर्ती घ्यायला गेलो तर साडेपाच हजार लागतील. एवढी रक्कम आणायची कुठून?
-आशीष कांबळे, भाविक
२३ जून रोजी आम्ही मूर्ती बुक केली होती. मूर्ती तयार होती, पण रंगकाम झाले नव्हते. आज आलो तर सगळी मंडळी गायब आहेत. फोनही लागत नाही. आता काय करावे कळत नाही.
-पराग व कल्याणी थोरात, भाविक